मागील वर्षी सुरू झालेले कोरोनाचे संकट अचानक झालेला लॉकडाऊन यामुळे लावणी कलावंतांची मोठी वाताहत झाली.
संपूर्ण उपजीविका कला केंद्रात कला सादर केल्यानंतर भागू शकते, मात्र कला केंद्रच बंद झाल्याने करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मागील तीन महिन्यांपासून काही प्रमाणात कला केंद्र सुरू झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता.
आता अचानक ३० एप्रिलपर्यंत कला केंद्र बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे महिनाभर करायचे काय? पैसे न आल्यास जगायचे कसे? खायचे काय? असे एक ना अनेक प्रश्न कलावंतांसमोर आहेत. शासनाने आदेश कायम ठेवल्यास अनेक कलावंत गावाचा रस्ता धरतील आणि एकदा कलावंत गेल्यास ते परत आणणे आणि परत कला केंद्र सुरू करणे अवघड असल्याने कला केंद्रमालक देखील चिंतेत आहेत.
एकीकडे शासनाची तोकडी मदत असताना देखील कलावंत त्यांची कला सादर करून संसार चालवीत असताना आता परत त्यांची रोजीरोटी बंद झाल्यास शासन काय मदत करणार, हे देखील स्पष्ट नाहीये. मागील वर्षी कर्जबाजारी झालेले कलावंत आता आर्थिक संकटात आहेत.यामुळे कला केंद्र नियम व अटीसह चालू ठेवा, अशी मागणी करत आहेत.
वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रात सुमारे ३०० कलावंत संगीत बारी सादर करून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. आता अचानक ३० एप्रिलपर्यंत कला केंद्र बंद झाल्यास कलावंत गावी जाण्याची तयारी करत आहेत. कला केंद्र बंद झाल्यास आपल्या मुलाबाळांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय कशी करावी याची चिंता त्यांना आहे.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या बजेट मध्ये सांस्कृतिक विभागासाठी १६१ कोटी रुपयांची तरतूद असल्याचे जाहीर केले होते. मात्र संगीत बारी कलावंतांसाठी त्यातील किती निधी मिळणार याकडे आता लक्ष आहे.मागील वर्षी झालेला लॉकडाऊन आणि यंदा परत आलेले संकट यामुळे लावणी कलावंत शासनाच्या मदतीची देखील वाट पाहत आहेत.
--
चौकट :-
महाराष्ट्र राज्यात संगीत बारी कलावंत व कला केंद्र मालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून सुमारे १५ ते १६ हजार लावणी कलावंतांच्या उवजीविकेचा प्रश्न असल्याने शासनाने मदत करणे गरजेचे आहे. मागील वर्षी पूर्णपणे बंद राहिल्याने अनेक कलावंत कर्जबाजारी झाले आहेत. कला केंद्र मालक देखील आर्थिक विवंचनेत आहेत. अशात आता परत महिनाभर कला केंद्र बंद राहिल्यास कलावंतांचे जगणे मुश्किल होणार आहे. यामुळे अटी व शर्तींसह कला केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोक जाधव यांनी केली आहे.
फोटो :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या लावणी महोत्सवात लावणी सादर करताना लावणी कलावंत.