पुणे : राज्य शासनाने प्राध्यापक भरतीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आणि तासिका तत्त्वावरील नियुक्तीच्या (सीएचबी) चुकीच्या धोरणामुळे सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली असून, लॉकडाऊनच्या काळात तर काही अनेक सीएचबी प्राध्यापकांना शेतमजुरी करण्यासाठी जावे लागले. त्यामुळे शासनाने पूर्णवेळ प्राध्यापक भरतीबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सुमारे दहा वर्षांपासून प्राध्यापक भरतीचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच राज्य शासनाने सीएचबीसाठी निश्चित केलेले मानधनही खासगी विना अनुदानित महाविद्यालयांकडून प्राध्यापकांना दिले जात नाही. तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत असल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना वेगळा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी तर नोकरी मिळण्याची आशाच सोडून दिली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी राज्यात सुमारे एक हजार प्राध्यापकांची पदे भरती करण्यात आली. मात्र, त्यानंतर प्राध्यापक भरतीचा निर्णय लाल फितीच्या कारभारात अडकून पडला आहे.
---------------------------
म्हणून शेतमजुरी करावी लागते
लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयांकडून सीएचबीचे मानधान वेळेत मिळू शकले नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला शेतमजुरी करावी लागली. तसेच शासनाने मंजूर केलेली रक्कम महाविद्यालयांकडून सीएचबी प्राध्यापकांना दिली जात नाही. शासनाने सीएचबी धोरण बंद करून पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती करावी.
- मनोहर आव्हाड, सीएचबी प्राध्यापक
-----------------------------
विना अनुदानित महाविद्यालयांकडून सीएचबी प्राध्यापकांची शारीरिक व मानसिक पिळवणूक केली जाते. प्राध्यापकांना वेळेवर तुटपुंजे मानधनसुद्धा दिले जात नाही. पूर्णवेळ प्राध्यापक आणि सीएचबी प्राध्यापक एकच काम करतात, तरीही त्यांच्या वेतनात खूप मोठी तफावत असते. त्यामुळे शासनाने प्राध्यापक भरतीचा प्रश्न मार्गी लावावा.
- नीलेश गायकवाड, सीएचबी प्राध्यापक
----------------------------
इतर पर्यायांचा स्वीकार
राज्य शासनाने प्राध्यापक भरतीचा प्रश्न प्रलंबित ठेवला असून इतक्यात भरतीचा प्रश्न मार्गी लागेल, असे दिसत नाही. त्यामुळे माझ्यासह अनेकांनी रोजगार व उदरनिर्वाहासाठी वेगळ्या पर्यायाचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. १५ ते २० हजारांत घर चालवणे शक्य होत नसल्याने एका प्राध्यापकाला दोन वेगवेगळ्या ठिकाणी तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे.
- दादासाहेब मगर , सीएचबी प्राध्यापक
--------------------------
सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच
बहुतेक वेळा महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनाच पुढे पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नियुक्त केले जाते. परिणामी, नेट-सेट उत्तीर्ण बेरोजगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच सेट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे.
---------------------------------
दहा वर्षांपासून लटकला प्रश्न
प्राध्यापक भरतीबाबत बिंदुनामावली (रोस्टर) मधील वाद, मराठा, मुस्लीम आरक्षण आदी कारणांमुळे प्राध्यापक भरतीचा प्रश्न सुमारे दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने सकारात्मक धोरण स्वीकारून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा सहायक पदासाठी पात्र असलेल्या प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.