भिगवण : इंदापूर तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एक आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. अशा विपरीत परिस्थितीमुळेच विद्यार्थ्यांना खासगी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा लागतो. अशा संस्थांमध्ये प्रवेशशुल्काच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांवर जीव देण्याची वेळ येते, अशी भावना मदनवाडीच्या साईनाथ पोपळभट याच्या आत्महत्येनंतर व्यक्त होत आहे.
इंदापूर तालुका औद्योगिक उत्पादने तयार करण्याबाबत जगाच्या नकाशावर नाव कोरणारा तालुका आहे. संरक्षण दलातील उत्पादनांपासून विमानाचे भाग बनविण्यासाठी या तालुक्यातील वालचंदनगरची ओळख आहे. तीन साखर कारखाने आणि फॅब्रिकेशन उत्पादनांचे प्रकल्प असणाºया या तालुक्यात एमआयडीसीही सुरू करण्यात आली आहे. अनेक उद्योजकांना येथे गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन रोजगार वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. असे असताना या प्रकल्पांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मात्र एकच आहे. करोडो रुपयांच्या जाहिराती करणाºया शासकीय यंत्रणेने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या वाढविली असती, तर फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे जीव द्यायची वेळ साईनाथ पोपळभट या विद्यार्थ्यावर आली नसती. त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्यात कळस- लासुर्णे भागात तसेच भिगवणसारख्या व्यावसायिक बाजारपेठेसारख्या गावात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी करणे गरजेचे आहे. यातून फी भरता येत नाही, म्हणून आणखीन कोणी साईनाथ गळफास लावून घेणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. साईनाथच्या अचानक जाण्याने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आश्रमशाळांच्या ठिकाणी मदत करणाºया भिगवणकरांनी साईनाथची मदत करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक एम. जी. जगताप यांनी केला.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची अपुरी संख्यातालुक्याची भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे या भागातील तरुणांना आयटीआय प्रशिक्षण घेण्यासाठी हजारो रुपयांची फी भरून खासगी केंद्रात प्रवेश घ्यावा लागतो. ज्यांना फी भरणे शक्य होते असे विद्यार्थी प्रवेश घेतात; मात्र ज्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे अशांना आपल्या इच्छेला मुरड घालून इतर कोर्सकडे वळावे लागते.