नीरा : नीरा-वाल्हे दरम्यान असलेल्या रेल्वे लाईनवर जेऊर येथील रेल्वेफाटक सुपरफास्ट एक्सप्रेसची वेळ असतांनाही रेल्वे फाटक उघडे राहिले. अचानक वेगाने आलेल्या हजरत निजाम्मूद्दीन (१२६२९) संपर्क एक्सप्रेसमुळे रेल्वेलाईल ओलांडणा-या नागरिकांची घाबरगुंडी उडाली. ही गाडी येताना ट्रकवर कुठलाही नागरिक नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली. ही घटना बुधवारी (दि. १०) सकाळी ९.१० वाजता जेऊर रेल्वे फाटक येथे घडली. गेट उघडे असल्याने गेटमनने रेल्वे ट्रकवर रेल्वे चालकाला दिसण्यासाठी लाल झेंडा लावला होता. मात्र, हा झेंडा उडवून गाडी वेगात पुढे गेली. नीरा वाल्हे रेल्वे लाईन दरम्यान जेउर येथे यांत्रिक सिग्लल नसलेले रेल्वे गेट आहे. येथील गेटमन द्वारे हे रेल्वे येताना आणि जातांना हे फाटक बंद केले जाते. बुधवारी सकाळी ९ वाजता सुपरफास्ट रेल्वेची वेळ असतांनाही हे फाटक उघडे राहिले. हे फाटक उघडे आहे याची माहिती रेल्वे चालकाला व्हावी यासाठी गेटमनने रेल्वेट्रकवर लाल झेंडा लावला होता. ९ च्या सुमारास या ट्रकवरून हजरत निजाम्मूद्दीन (१२६२९) संपर्क एक्सप्रेस ही वेगाने याली. यावेळी या रेल्वे लाईनवरून नागरिकांची ये-जा सुरू होती. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९.१० वाजता पंढरपूर पालखी मार्गावरुन जेऊर गावाकडे जाणा-या रस्त्यावरील रेल्वे फाटक (क्रं.२८ सी - २ई) उघडे असल्याने वाहनचालक आपली वाहने बिंदक्त पणे नेत होती. अचानक रेल्वे गाडीचा आवाज आल्याने दुचाकीस्वारांनी आरडाओरडा केला. याच वेळी जुऊर येथील रहिवासी संभाजी ठोंबरे आपल्या चारचाकी मारुती अल्टो कारने जेऊरकडे निघाले होते. त्यांच्या गाडीने फाटक ओलांडत असताना समोरील दुचाकीस्वारांनी आरडाओरडा केला असता ठोंबरे यांनी आपली कार तात्काळ थांबवली व मागे घेतली. रेल्वे फाटक उघडे असल्याची माहिती देणारा ट्रॅकवर गेटमनने लावलेला लाल झेंडा असतांना रेल्वे चालकाने गाडीचा वेग करणे अपेक्षित होते. मात्र, रूळावरील हा झेंडा उडवून गाडी वेगात निघून गेली. या घटनेत कोणतीही हानी झाली नसली तरी घटना गंभीर असल्याने पुणे डिव्हिजनलचे चौकशी अधिकारी जॉर्ज यांनी दुपारी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. सकाळी घडलेल्या घटनेबाबत रेल्वेच्या कर्मचा-यांनी कमालीची गुप्तता पाळत जवाबदारी टाळण्याचे प्रयत्न केले. नीरा रेल्वे स्टेशन मास्टर वाल्हे स्टेशन मास्टरवर जावाबदारी ढकलत होते. तर वाल्हे स्टेशन मास्टर यांनी गेटमनला कल्पना दिली होती असे सांगितले. मात्र २८ सी - २ई क्रमांक फाटकावरील गेटमनने मला नीरा बाजुकडून गाडी येत आहे, अशी कल्पना दिली नसल्याने फाटक बंद केले नाही असे सांगितले. नीरा, वाल्हे व फाकट क्रमांक २८ वरील रेल्वे फोनच्या डिटेल्स चौकशी केल्यावर वास्तव परिस्थिती समोर येईल. पण दुर्घटना घडली असती तर नाहक कीती बळी गेले असते हा प्रश्र्न निर्माण झाला आहे अशी चर्चा लोकांनी केली.
काळ आला होता पण.. जेऊर येथे लालबावटा उडवून रेल्वे गेली सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 8:23 PM
रेल्वे रुळावर लावलेला लाल बावटा पाडुन एक्स्प्रेस जोरात गेली. मोठा अनर्थ टळला असला तरी रेल्वे विभागाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे...
ठळक मुद्देमोठी दुर्घटना टळली, गेटमन आणि स्टेशन मास्टरचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप