भिगवण : उजनीतील पाणीसाठा कमी होत असल्याने मासेमारी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. परप्रांतीय कामगारांनी आपले बिऱ्हाड गावाकडे नेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी नावलौकिक असणाऱ्या भिगवण मासे बाजारात पाण्याबरोबरच माशांचाही दुष्काळ पडलेला दिसून येत आहे.पुण्यापासून सोलापूरपर्यंत मासे खवय्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भिगवण गावात आता ग्राहकांना जादा दराने मासे खरेदी करावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण उजनीतील झपाट्याने कमी होत असलेला पाणीसाठा आहे. पाणी कमी असल्याने मासेमारी करणाऱ्या कामगारांना दिवसभर मासेमारी करून माल मिळत नाही. त्यामुळे आपले आणि आपल्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भिगवणला होलसेल भावात मासे खरेदी करणारे व्यापारी दत्ता लोखंडे, अर्जुन जराड, सुभाष चव्हाण, रोहित माडगे यांनीही खरेदीभावात मोठी वाढ झाल्याचे सांगितले. सध्या पाणी उजनीच्या पोटात गेल्याने काही प्रमाणात मिळत असलेले मासे फार दिवस पुरणार नसल्याचे मासेमारी करणारे कामगार राजू तांडेल आणि काटा कामगार संजय काळे यांनी सांगितले. मासे पकडणारा बहुतांश कामगार हा परप्रांतीय असल्यामुळे ते या परिस्थितीत आपल्या गावाकडे परत जात आहेत. याबाबत मासे लिलाव करणारे व्यापारी माऊली नगरे यांनी काट्यावर लिलावासाठी कमी माल येत असल्याचे सांगितले. यामुळे भावात दुपटीने वाढ झाल्याचे सांगितले. २० ते ४० रुपये किलो मिळणारा चिलापी मासा ६० ते ८० रुपयांवर गेला आहे. तर इतर गुगळी, वाम, मरळ, शिंगटा यांचाही भाव दुपटीने वाढल्याचे सांगितले.
मासेमारी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: April 25, 2016 1:59 AM