--
तळेगाव ढमढेरे : भैरवनाथनगर येथील वेळ नदीवरील बंधाऱ्यावरुन जाणाऱ्या पुलाचे लोखंडी कठडे तुटलेले असून येथील नागरिकांना धोकादायक पुलावरून ये - जा करावी लागत आहे. कठडे तातडीने बसवावेत. अन्यथा आंदोलन केले जाईल, असे निवेदन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष शंकर भुजबळ यांनी तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षक भवन समोरील भैरवनाथनगर स्मशानभूमीजवळ असलेल्या वेळ नदीवर बंधाऱ्याच्या पुलावरून येथील पांढरीवस्ती, जाधववस्ती, तांबुळ ओढा, दराकेवस्ती, तांबूळ ओढा, २४ वा मैल, धायरकर वस्ती या वस्तींवरील पायी जाणाऱ्यांची आणि दुचाकींची मोठी वर्दळ असते. मात्र बंधाऱ्यावरील पुलाचे लोखंडी कठडे गेल्या वर्षीच्या महापुरात तुटले त्यामुळे बंधाऱ्यावरून वाहतूक करताना पडून एका इसमाचा मृत्यू झाला, ही घटना पुन्हा पुन्हा होऊ शकते त्यामुळे ती टाळण्यासाठी कठडे बसविण्याची मागणी होत आहे.
सध्या या बंधाऱ्याच्या पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांचा तोल गेल्यास मोठा अपघात होण्याची तसेच पुन्हा एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची दाट शक्यता असून नागरिकांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे, मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देत नाही तरी तातडीने कठड्यांची दुरुस्ती करावी अन्यथा ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा शिरूर तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष शंकर भुजबळ यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
--
चौकट १
--
तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीवरील बंधाऱ्याच्या पुलाच्या कठड्याबाबत व बंधाऱ्याच्या पुलाबाबत पाठबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे, पाठबंधारे विभागाने हे काम न केल्यास ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- उपसरपंच, नवनाथ ढमढेरे
-
भैरवनाथ नगर येथील वेळ नदीवरील बंधारा नागरिकांना ये-जा करण्यास अतिशय धोकादायक झाला आहे, साधारण पंधरा दिवसापूर्वी या बंधाऱ्यावरून एका इसमाचा तोल गेल्याने मृत्यू झाला जर ही कामे संबंधित प्रशासनाने वेळेत पूर्ण केली असती. तर या इसमाचा प्राण वाचला असता. मयत झालेल्या इसमाची पत्नीचे गेल्यावर्षी निधन झाल्याने त्यामुळे त्यांची मुले निराधार झाली. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रशासनाने मोठी मदत करणे गरजचे आहे. - शंकर भुजबळ
उपाध्यक्ष, शिरूर तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल
--
फोटो क्रमांक : २९ तळेगाव ढमढेरे वेळ नदी बांधावर कठडे
फोटो ओळ – तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीच्या बंधाऱ्यावरील तुटलेले कठडे