पुणे : दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले, पण सास-यांनी दया दाखवून घरावरील एक छोटी रूम रिकामी करून त्यांची राहण्याची सोय करून दिली. पण दोघी बहिणींचे आणि त्यांच्या मुलांचे खाण्याचे - पिण्याचे हाल होऊ लागले. नव-यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास ते आरडाओरड करून निघून जात असतं. त्यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. मात्र नांदायला येण्यासाठी अर्ज केल्याचा राग मनात धरून त्यांचा किराणा बंद करण्यात आला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
शेवटी तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केल्यावर दोन वर्षांच्या खडतर परिस्थितीनंतर त्यांना पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. प्राजक्ता आणि सुरेखा (नावे बदललेली) या दोघींना लग्नानंतर क्षुल्लक कारणांच्या वादामुळे खडतर आयुष्य जगण्याची वेळ आली. त्यांना घराबाहेर काढले. दोघी बहिणींच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी सामंजस्याने वाद मिटवण्याचे अतोनात प्रयत्न करून सुध्दा सासू ने घरा मध्ये घेतले नाही. हिंदू मॅरेज अँक्ट, १९५५ च्या ‘कलम ९’ नुसार त्यांनी न्यायालयात नांदायला येण्याचा अर्ज केला. त्यानंतर त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली. मुलांना व सुनांना खाण्यासाठी कधीतरी दिला जाणारा किराणाही बंद करण्यात आला. दोघी बहिणींना एक वेळचे मिळणारे जेवणही बंद झाले. त्या दोघींनी वकिलामार्फत तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केला. मात्र कोरोनानंतर लॉकडाऊन लागला.
सामाजिक कार्य करणा-या लोकांकडून मिळणा-या किराणा मालाच्या किटवर त्यांना आपले पोट कसेबसे भागवावे लागत होते. अखेर दोन वर्षांच्या खडतर परिस्थिती नंतर न्यायालयाने दोघी बहिणींना तात्पुरती पोटगी च्या अर्जाच्या तारखेपासून (दोन वर्षा पासून) पोटगी देण्याचा आदेश दिला. मुलांच्या शाळेची फी जेव्हा द्यावी लागेल तेव्हा नव-यांनी ती द्यावी तसेच अर्जाचा खर्च सुध्दा नव-यांनी अर्जदार यांना द्यावा असे आदेशात नमूद केले आहे. दोघी बहिणींच्या वतीने अँड. संग्राम माधवराव जाधव व अँड. प्राची संग्राम जाधव यांनी काम पाहिले.
''कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मर्यादित वेळेत आणि मर्यादित कार्यक्षमतेत न्यायालयाचे कामकाज चालू होते. या संधी चा फायदा घेऊन कधी वडील आजारी आहेत तर कधी इतर कारणांमुळे न्यायालयाचे प्रकरण लांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे अँड. संग्राम माधवराव जाधव (बहिणींचे वकील) यांनी सांगितले.''