पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. यंदा प्रथमच भाषा विषयाची परीक्षा कृतिपत्रिकेवर आधारित घेण्यात आली. परंतु, कृतिपत्रिकेतील प्रश्न समजावून घेऊन त्यानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास वेळ अपुरा पडला, अशा तक्रारी पुण्यातील काही परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी केल्या.राज्य मंडळातर्फे मराठीसह सर्व भाषा विषयांच्या प्रचलित मुल्यमापन पद्धतीत बदल करण्यात आला. त्यामुळे दहावीच्या भाषा विषयाच्या नेहमीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलून ते ‘कृतिपत्रिका’ स्वरूपात करण्यात आले. भाषा म्हणजे केवळ वाड्मय, साहित्याचा अभ्यास, गद्य-पद्य, स्थूलवाचन, व्याकरण यांचे पारंपरिक शिक्षण हा दृष्टीकोन बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी भाषेचा संबंध प्रत्यक्षात आपल्या जीवनाशी जोडला पाहिजे. दहावीची भाषा विषयाची परीक्षा प्रश्नोत्तर स्वरूपावर किंवा घोकंपट्टीवर आधारित राहू नये. तर विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन, उपयोजन, क्षमतांचा विकास व्हावा, या उद्देशाने राज्य मंडळाने मुल्यमापन पद्धतीत बदल केला आहे.(प्रतिनिधी)वेगळा अनुभवमंगळवारी परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा मराठी भाषा विषयाचा पेपर घेण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा अनुभव होता.पेपर सोपा असला तरी वेळ कमी पडल्याने सर्व प्रश्न सोडवता आले नाहीत, अशी चर्चा पेपर देऊन परीक्षा केंद्राबाहेर आलेले विद्यार्थी करत होते.मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेऐवजी आम्हाला कृतिपत्रिकेवर आधारित प्रश्न सोडवावे लागणार आहेत. याबाबत आम्हाला पूर्ण कल्पना होती. मात्र, उपलब्ध वेळेत सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास वेळ कमी पडला.- तृणाल नलावडे, विद्यार्थी पूर्वीची प्रश्नोत्तराची पद्धतच योग्य होती. कृतिपत्रिकेतील प्रश्न समजावून घेऊन त्यांची मांडणी करण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे पेपर लिहिण्यास वेळ कमी पडला. - स्वप्निल धुमाळ, विद्यार्थी
कृतिपत्रिकेने खाल्ला वेळ
By admin | Published: March 08, 2017 5:11 AM