नीरा : श्री कानिफनाथांच्या नावाने राज्यभरात उसाच्या रसवंतिगृहाचा व्यवसाय करणारे मूळचे पुरंदर तालुक्यातील. मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूर ते नंदुरबार या अखंड महाराष्ट्रात लहानमोठ्या शहरात उन्हाळ्यात चार महिने उसाचा रस मिळण्याचे ठिकाण म्हणजे रसवंतिगृह. गेली दोन वर्षे सततचा लॉकडाऊन व व्यवसायावर आलेले निर्बंध यामुळे या रसवंतिगृहाची चाके तर फिरलीच नाही किंवा रस्त्याने वा बस स्टँडवरचा घुंगरांचा खुळखुळाट ऐकू आलाच नाही.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे रसवंतिगृहांचा व्यवसाय बंद पडला आहे.
. पुरंदर तालुक्यात या व्यवसायाशी संबंधित अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुरंदरमधील रसवंतिगृह व्यावसायिक प्रमोद रामचंद्र फडतरे, दत्तात्रय काशिनाथ फडतरे मूळ रहिवासी बोपगाव (मुंबई), विठ्ठल जयसिंग दुरकर, गोकुळ राजाराम दुरकर दोघे मूळ रहिवासी गराडे (कोकण), नितीन फडतरे बोपगाव (टेंबुर्णी), महावीर भुजबळ वाल्हे, प्रकाश पवार, अर्जुन दुर्गाडे, सागर इंगळे, दत्तात्रय भुजबळ आदी रसवंतिगृह व्यावसायिकांवर आर्थिक संक्रात आली आहे.
दरवर्षीच फेब्रुवारी महिन्यापासून रसवंतिगृहाचा व्यवसाय सुरू होतात. यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि जूनपर्यंत लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असते. रसवंती व्यवसायातून रसवंती मालक, काम करणारे मजूर, तसेच प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठा फायदा होतो.
मागील वर्षी व चालू वर्षीचीही रसवंतिगृहाचा हंगाम कोरोना संकटामुळे वाया गेला. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र नागरिकांनी उसाचा रस खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर थंड पदार्थ टाळावे, अशी खबरदारी सुचविण्यात आल्यानंतर नागरिकांनी उसाचा रस तसेच इतर शीतपेयांकडे पाठ फिरवली.
या वर्षीही ऐन उन्हाळ्यामध्येच कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत राहिल्याने, राज्य सरकारकडून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. मागील वर्षांप्रमाणेच या वर्षीही लॉकडाऊन जाहीर झाल्याने रसवंती व्यवसाय बंद पडले.
रसवंतिगृहासाठी लागणारा ऊस उत्पादक शेतकरी वर्गालाही सलग दुसऱ्या वर्षी मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. रसवंती व्यवसायाला पूरक म्हणून अनेक शेतकरी दरवर्षी उसाचे उत्पादन घेतात. थोड्याफार प्रमाणात प्रत्येकजण ऊसाची लागवड करतात. त्यातील अनेक जण रसवंती व्यावसायिकांना ऊस विकून हजारो रुपयाचे उत्पन्न या माध्यमातून काही शेतकऱ्यांना होते. मागील वर्षीचा रसवंतीगृहाचा हंगाम वाया गेला असला तरी यावर्षीचा हंगाम तरी चांगला जाईल, असे अनेक ऊसउत्पादक शेतकरीवर्गाला वाटत असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी रसवंतीगृहाचा ऊस मागील महिन्यापर्यंत शेतातच ठेवला होता. मात्र कोरोना संकट आणखीच गडद होत असल्याचे पाहून, तसेच शासनाकडून जाहीर केलेला लाॅकडाऊन संपत नसल्याने, मागील वर्षांपासून रसवंतीगृहच बंद पडल्याने शेतातील ऊसाला मागणी नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी शेतामधील ऊस जनावरांना चारला असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सतीश भुजबळ, अर्जुन दुर्गाडे यांनी सांगितले.
"मुंबईत ऊन्हाळा चार महिने असलातरी एप्रिल आणि जून मध्ये लोक मोठ्याप्रमाणावर ऊसाच्या रसाला मागणी असते. यादोन महिन्यात लाखोंची उलाढाल होत असते. गेली दोन वर्षे लॉकडाऊनमुळे ऐन हंगाम वाया गेला. आर्थिक चणचण मोठी निर्माण झाली आहे. कर्जाचे हप्ते थकत आहेत. शासनाने रिक्षावाल्यांना मदत केली पण स्वदेशी उत्पन्न व आरोग्यास हितकारक असलेल्या व्यावसायिकाचा कुठेच विचार केला नाही. यापुढे तरी कर्जाच्या हप्त्यात सवलत किंवा अनुदानरुपी मदत मिळावी."
विजय लक्षमण फडतरे बोपगाव (मालाड, मुंबई)
कोरोना संकटामुळे पुरंदर तालुक्यातील रसवंतिगृह बंद ठेवण्यात आले आहेत.