डिंभे : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीणे आरोग्यसेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेमार्फत रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. मात्र, ग्रामीण भागात रस्तेच नसल्याने पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात आजही रुग्णांना झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ येत आहे. आंबेगाव तालुक्यातील बोरघर-घोडेवाडी (ता. आंबेगाव) येथील एका वृद्धाला रस्ता नसल्याने अशाच पद्धतीने झोळीतून नेण्याची वेळ आली.
तावजी झावरू दगडे या वृद्ध आजोबांचा पाय पायरीवरून घसरून पडल्यामुळे त्यांचा पाय मोडला. पाऊस आणि पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे तब्बल १५ दिवस दगडे यांना उपचारासाठी नेता आले नाही. शेवटी काल पाऊस कमी झाल्यानंतर प्रचंड वेदना सहन करणाऱ्या या आजोबांस झोळी करुन, चिखलमय रस्त्यावरुन कुटुंबातील सदस्यांनी आपला जीव धोक्यात घालून उपचारासाठी दवाखान्यात नेले. सुदैवाने आजोबांना सुखरुप उपचारासाठी दवाखान्यापर्यंत नेण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाऊस व झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मात्र या आजोबांना सुमारे १५ दिवस उपचाराअभावी राहावे लागले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आजोबांच्या किंवा नेणाऱ्या व्यक्तींच्या जिवावर बेतले असते, तर याला जबाबदार कोण? प्रशासन आमच्या जिवासी का खेळत आहे. वारंवार या रस्त्याच्या कामासाठी मागणी करूनही आमच्या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांची आहे. अजून किती वर्षे हा त्रास आम्ही सहन करायचा? आमचा जीव इतका स्वस्त वाटतो आहे का? असा संतप्त सवालही ग्रामस्थांकडून केला जात आहे.
फोटो : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे उपचाराकरिता दवाखान्यात नेण्यासाठी कुटुंबाला झोळीचा वापर करण्याची वेळ आली.( छायाचित्र-कांताराम भवारी)