लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पंढरीच्या सावळया विठूरायाच्या भेटीसाठी शेकडो वर्षापासून निघणारी पालखी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम असून, या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी बैठक घेण्यात आहे. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा असलेला पालखी सोहळा दरवर्षी नित्यनेमाने आळंदी आणि देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. वीस दिवसांच्या काळात वाटेवरच प्रत्येक गाव टाळ, मृदंग आणि अभंगात तल्लीन होते. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदादेखील सार्वजनिक पालखी सोहळा रद्द होणार की नाही, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार बैठक घेणार आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अन्य जिल्ह्यात परिस्थिती अद्याप ही गंभीरच आहे. सर्वच यंत्रणेकडून कोरोनाची तिसरी लाट यापेक्षा अधिक गंभीर असल्याचे इशारे दिले जात आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता यंदा पालखी सोहळ्याचे स्वरूप काय असेल याचा आढाव घेण्यासाठी उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली.