दावडी : कनेरसर (ता. खेड) येथील वेळ नदीवरील बंधारा तुडुंब भरला आहे. बंधाऱ्यात पाणी साठल्याने रब्बी हंगामातील पिकांची चिंता मिटली असून, शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. खेड तालुक्याच्या पूर्व भागात परतीचा पाऊस बऱ्यापैकी झाल्याने येथील तलाव, तळी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कनेरसर येथील वेळ नदीवरील बंधारा तुडुंब भरला आहे. दरवर्षी या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. यंदा मात्र जुने ढापे दुरुस्ती करून व काही ठिकाणी नवीन ढापे बसविल्यामुळे पाण्याची गळती थांबली आहे. या बंधाऱ्याच्या पाण्यावर शेतकरी रब्बी हंगामातील गहू, कांदा, बटाटा व इतर तरकारी पिके घेतात. बंधारा तुडुंब भरल्यामुळे या परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहते. (वार्ताहर)खोडद : हिवरे तर्फे नारायणगाव येथील शिंदे मळ्याच्या शिवारात जिल्हा परिषदेकडून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे व जलपूजन जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच सुधीर खोकराळे, ग्रामपंचायत सदस्य अॅड. निखील डोंगरे, नयना थोरात, पुष्पा रणदिवे, सुधीर शिंदे, विनायक मुळे, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सुनील गायकवाड, माजी संचालक अर्जुन शिंदे, सुभाष खोकराळे, दीपक कोकाटे, सुदर्शन शिंदे, ग्रामसेविका आर. आर. इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. या बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे परिसरातील २५ हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा लाभ होणार आहे. परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. या सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहेत. यात पाणीसाठादेखील मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
वेळ नदीवरील बंधारा तुडुंब
By admin | Published: November 11, 2015 1:38 AM