नीरा : नीरा नदी उशाला असून, तसेच नीरा डावा कालवा भरून वाहत असताना गुळुंचे (ता. पुरंदर) येथील तुकाईनगर (माळवस्ती) भागातील महिला, मुले व तरुण डोक्यावर हंडे, कळशा घेऊन पाणी भरताना दिसत आहेत. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे. नीरा डाव्या कालव्याच्या विहिरीवरील पाणी तीन किमी अंतरावर प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या टाकीत सोडले जाते. गावठाण व वाड्या-वस्त्यांसाठी दोन स्वतंत्र टाक्या बांधण्यात आलेल्या असून, दोन्ही टाक्यात पाणी आहे. मात्र, येथील तुकाईनगर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी सोडले जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.दरम्यान, याबाबत माहिती घेतली असता तुकाईनगर भागात समाजमंदिराच्या नजीकच्या ठिकाणी तोट्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे साहजिकच पाणी सोडले असता ते साठून त्यावर डासांची उत्पत्ती होऊन आजारांची संख्या बळावत आहे. त्यामुळे पहिली गटार लाईन काढावी व नंतर पाणी सोडावे अशी भूमिका काहींनी घेतल्याने पूर्ण वस्तीचे पाणी बंद केल्याने नागरिकांच्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.येथील तुकाईनगर हा भाग रेकॉर्डप्रमाणे गायरान जागेत येत आहे. येथील घरांच्या नियमित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मोकळी जागा ग्रामपंचायतीकडे निहित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या पत्रानंतर ही प्रक्रिया होणार असल्याने प्रथम जागा नियमित करण्याची वाट पाहावी लागणार आहे.आदर्श ग्राम गुळुंचे येथे विविध विकासकामे झाली. मात्र, पाण्याचा प्रश्न मिटविण्यात अद्यापही यश आलेले नाही. येथील गटात एक विहीर असून ती यापूर्वी दहा वर्षं भाडेपट्ट्याने एकाला देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर गेल्या दहा-पंधरा वर्षांत ही व्यक्ती अद्यापही विहिरीचे पाणी वैयक्तिक कामांसाठी वापरत असून हा बेकायदा ताबा हटविल्यास गावाला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करण्यासाठी नव्याने विहीर खणण्यासाठी जागा शोधत बसण्याची वेळ येणार नाही. मात्र, यासाठी संबंधित तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी वेळीच लक्ष घालून विहीर ग्रामपंचायतीकडे निहित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणीसध्या नीरा डाव्या कालव्यातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कालव्याच्या शेजारील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. मुबलक पाणी विहीरीत उपलब्ध नाही. आहेतेच पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली दोन दिवस एका वस्तीवरील विवाहसोळ्या निमित्त तीथे पाणी जादा सोडण्यात आले आहे. कामगारांनी कामचुकारपणा केल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते. आज पासून वेळापत्रक पुर्ववत करण्यात येत आहे.- संभाजी कुंभार, सरपंच, गुळुंचे
ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ, गुळुंचे येथील तुकाईनगरमध्ये पाणीटंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:19 AM