पुणे: कोरोनाशी झुंज देत आयसीयूमध्ये असणाऱ्या महिलेने अवघ्या साडे सात महिन्यांच्या बाळाला जन्म दिला. अशा परिस्थितीत बाळाचा व्यवस्थित सांभाळ होणे गरजेचे होते. त्याला आईची माया मिळावी या उद्देशाने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. शेजारधर्म पालनाचे हे एकमेव उदाहरण पाहायला मिळत आहे.
चार दिवसांपूर्वी पुण्यातील योग रुग्णालयात एका साडे सात महिन्यांच्या बालकाचा जन्म झाला. दुर्देवाने आई प्रियंका गौर या कोरोनाबाधित असल्याने बाळाला तातडीने त्यांच्यापासून वेगळे करावे लागले. कारण आई कोरोनाशी झुंज देत आयसीयूमध्ये आहे. तर त्यांच्या परिवारातील आजीही व्हेंटिलेटरवर आहे. वडिलांना सर्वांकडे लक्ष द्यावे लागत असल्याने ते हतबल झाले होते. पण अशाच परिस्थितीत त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या जनाबाई पवार आणि आशा बारडे मदतीस धावून आल्या आहेत. त्यांनी कुटुंबाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला असून सर्व बरे होईपर्यंत बाळाचा सांभाळ करण्याचा निर्धार केला आहे.
यासाठी त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट केली. ती निगेटिव्ह आल्यावर त्यांनी बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन्ही महिलांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता कोविड काळात बाळाची देखभाल करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या दोन्ही महिला सद्यस्थितीत कोविड रुग्णालयात राहत आहेत. सर्व प्रकारची योग्य खबरदारी घेऊनच बाळाचे पालनपोषण करत आहेत.
"आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे. अशा काळात आम्ही शेजाऱ्यांना असे एकटे अजिबात सोडणार नाही. बाळाला आईच्या प्रेमळ मायेची गरज आहे. त्यासाठीच आम्ही मदत करण्यास तयार झालो आहोत." असे जनाबाई पवार यांनी सांगितले आहे.
"आम्ही या बाळाला स्वतःचे मुलं समजून सांभाळ करत आहोत. बाळाची पूर्ण वाढ झाली नसल्याने त्याचे पालनपोषण कसे करावे. हे सर्व आम्हाला माहीत आहे. हे आमच्यासमोरील आव्हान असले तरी ते आम्ही स्वीकारले आहे. कोव्हिडंची भीती असली तरी आम्ही तंदुरुस्त आहोत. या विचारानेच बाळाला सांभाळण्याचे कर्तव्य पार पाडणार आहोत." अशी भावना आशा बारडे यांनी व्यक्त केली.
मुलाच्या वडिलांनी या कामासाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "आमच्या शेजारचे अशा प्रसंगात धावून आले. त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहील."
बाळाची डिलिव्हरी करणाऱ्या डॉ राजरत्ना दारक म्हणाल्या, कोरोनाच्या कठीण काळात रुग्णाच्या शेजारी कुटुंबातील सदस्यांसाठी धावून आले आहेत. हे अत्यंत हृदयस्पर्शी आहे. या स्त्रियांच्या मौल्यवान कार्याला आमचा सलाम आहे. त्या महिला बाळाला आपल्या नजरेपासून सोडून एक मिनिटही बाजूला जात नाही. आमच्याकडे येणाऱ्या कोरोनाबाधित गरोदर महिलांची परिस्थिती ही चिंताजनक आहे. पण त्यांची बाळ निरोगी आणि कोरोनामुक्त आहे. हा सर्वात मोठा दिलासा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.