- राजानंद मोरे।पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘पीएमपी ई-कनेक्ट’ या अॅपची वेळ ‘रिअल’ नसल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून केला जाणारा ‘रिअल टाईम’चा दावा फोल ठरला आहे. ‘अॅप’च्या प्रयोगाचे स्वागत होत असले तरी ‘रिअल टाईम’बाबत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी अनेक नवनवीन बदल करण्यासाठी सुरुवातीपासूनच पुढाकार घेतला आहे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांना थेट पीएमपीशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. ‘पीएमपी ई-कनेक्ट’ ही त्यापैकीच एक कल्पना आहे. नवी मुंबईमध्ये त्यांंनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून यशस्वी केली आहे. ‘पीएमपी’साठी त्यांनी दि. ७ जून रोजी हे अॅप प्रवाशांसाठी खुले केले.प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक बसची ‘रिअल टाईम’ वेळ कळावी, त्यानुसार त्यांना प्रवासाचे नियोजन करणे सोपे जावे, बसचे सध्याचे ठिकाण, बससेवेविषयी तक्रारी, वेळापत्रक अशा विविध गोष्टींचा समावेश या अॅपमध्ये करण्यात आलेला आहे.वेळेचा मुद्दा सोडल्यास उपयोगी...अडीच महिन्यांत सुमारे दहा हजार जणांनी ई-कनेक्ट अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्याचे दिसत आहे. त्यापैकी ३६७ जणांनी हे अॅप उत्कृष्ट असल्याबद्दल फाईव्ह स्टार दिले आहेत. त्यांनी त्यावर हे अॅप खूप चांगले असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले असून काहींनी सुधारणाही सूचविल्या आहेत.तर १०७ जणांनी फोर स्टार, ६२ जणांनी थ्री स्टार, २९ जणांनी टू स्टार तर १२८ जणांनी केवळ वन स्टार दिला आहे. यावरून तरी तुलनेने अधिक प्रवाशांनी या अॅपला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. रिअल टाईमचा मुद्दा सोडल्यास इतर गोष्टींबाबत प्रवाशांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.नेटवर्कची अडचण..रिअल टाईमबाबत प्रशासनाकडे काही तक्रारी येत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. कदाचित विविध कंपन्यांच्या विविध भागातील नेटवर्कच्या अडचणींमुळे ‘रिअल टाईम’ येत नसेल. जवळपास १४०० हून अधिक गाड्या जीपीएसच्या माध्यमातून ट्रॅक केल्या जात आहेत. या गाड्या रिअल टाईमनुसार स्थानकावर पोहचत असल्याचे दिसते.केवळ ८ ते १० टक्के काही अडचणी असल्याचे, पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.बसस्थानक : सोनल हॉल (वेळ : १२.४७)वज्र रेनबो २ (वारजे-माळवाडी) ही बस ३ मिनिटांत स्थानकावर येईल, असे दिसत होते. मात्र, ही बस या वेळेत आलीच नाही. त्यानंतर ४ मिनिटांत पुन्हा या बससाठी १४ मिनिटांची वेळ दाखविण्यात आली. तसेच ९४ क्रमांकाची कोथरूड डेपो ही बस ३० मिनिटांत येणार, असे दिसत असताना ती आधीच थांब्यावर दाखल झाली. त्यानंतर पुन्हा याच क्रमांकाची बस पुढील ६ मिनिटांत आली. इतर काही बसेसच्या बाबतीतही असेच अनुभव आले.बसस्थानक :फिल्म इन्स्टिट्युट२७६ क्रमांकाची चिंचवड गाव ही बस ५ मिनिटांमध्ये स्थानकावर येणार असे स्क्रीनवर दिसत होते. त्यानंतर शून्य मिनिट अशी वेळ आली. मात्र, प्रत्यक्षात प्रवासी बसच्या प्रतीक्षेतच होते. लगेचच ही बस ७ मिनिटांत येईल, अशी वेळ दिसू लागली.सद्यस्थितीत प्रवाशांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील विविध बसस्थानकांवर प्रत्यक्ष जाऊन चाचपणी केली. यावेळी थांब्यावर येणाºया बहुतेक बसच्या वेळा अॅपमधील वेळेशी काही मिनिटे पुढे-मागे असल्याचे दिसून आले. तर काही बस स्थानकावर येऊन गेल्याचे अॅपमध्ये दिसत होते.मी दररोज बसने ये-जा करतो. अॅप आल्यानंतर ते डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला. पण कधीच बस अॅपमधील वेळेनुसार स्थानकावर आल्याचा अनुभव आला नाही. त्यामुळे आता अॅपमध्ये वेळ पाहतच नाही. केवळ बस ट्रॅकिंग आणि तक्रारींसाठी त्याचा वापर करतो. हे अॅप चांगले असले तरी ‘रिअल टाईम’ खूप सुधारणा करणे आवश्यक आहे. - साजीद शेख, विद्यार्थी
पीएमपी ‘ई-कनेक्ट’चा वेळेचा दावा फोल; ‘अॅप’वरील वेळेत बस नाहीत, प्रवाशांना नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 4:56 AM