पुणे : तू पांढऱ्या पायाची आहेस. तू घरी आल्यापासून आम्हाला साडेसाती लागली आहे, अशी सातत्याने टोचणी देत सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा खुर्द परिसरात बुधवारी (दि. २४) ही घटना घडली.
काजल सागर झेंडे (वय २८, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कोंढवा खुर्द) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती, सासूसह पाच जणांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. याबाबत काजल हिची आई मुक्ताबाई मोरे (वय ४५, रा. दुधेबावी, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. सागर दत्तू झेंडे (वय २९), कौशल्या दत्तू झेंडे (वय ५७), दीपाली भारत पवार (वय ३७, रा. उरळी कांचन), रुपाली मिलिंद गरुड (वय ३३, रा. केशवनगर, मुंढवा) या चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी काजल हिचा २०१३ मध्ये सागर झेंडे याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनंतर किरकोळ कारणातून सासरच्या मंडळींनी काजलचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तिला सासरच्या लोकांकडून मारहण केली जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.