लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित १५ हजार डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या अर्जुन कढे व स्वित्झर्लंडच्या लुका कॅस्टेलनुव्हो या जोडीने आर्यलँडच्या कार व अमेरिकेच्या अलेक्झांडर कोटझेन यांचा ६-४, ७-५ यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर दुहेरीची अंतिम फेरीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांनी आठव्या गेमपर्यंत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे ४-४ अशी बरोबरी निर्माण झाली. नवव्या गेममध्ये अर्जुन व लुका याजोडीने सिमॉन व अलेक्झांडर यांची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-४ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये सिमॉन व अलेक्झांडर यांनी अर्जुन व लुका यांची सहाव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात ४-३ अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी त्यांना फार काळ टिकविता आली नाही. अर्जुन व लुका याजोडीने सिमॉन व अलेक्झांडर यांची पुढच्याच गेमला सर्व्हिस भेदली व ही आघाडी कमी केली. त्यानंतर ५-५ अशी बरोबरी असताना अर्जुन व लुका याजोडीने सिमॉन व अलेक्झांडर यांची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ७-५ असा जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्या जोडीला ६७ हजार ३५० रुपये व १८ गुण तर उपविजेत्या जोडीला ३९ हजार रुपये व १० गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे उपाध्यक्ष व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे उपाध्यक्ष प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धेचे सहसंचालक आश्विन गिरमे, पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रकाश तुळपुळे आणि डॉ चंद्रजीत जाधव, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : दुहेरी गट : अंतिम फेरी :
लुका कॅस्टेलनुव्हो, स्वित्झर्लंड-अर्जुन कढे (२) वि.वि. सिमॉन कार, आर्यलँड-अलेक्झांडर कोटझेन, अमेरिका ६-४, ७-५.