पुणे : सकाळीच महिलांना निरोप यायचा चला आवरा पटकन रॅलीसाठी जायचं आहे. महिला घरातील सगळं आवरत रॅलीसाठी पोहोचतात. त्यांचे काम केवळ एवढेच हातात पक्षाचा झेंडा आणि घोषणा देत चालत राहायचे. आणि रोजची हजेरी लावायची. हा त्यांचा रोजचा दिनक्रम ठरलेला. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली घरातील आणि बाहेरची धावपळ सोमवारी थांबली. या प्रचार काळात काहींनी पत्रके वाटली, तर काहीजण सभांमध्ये सहभागी झाले. तर महिलांप्रमाणे अनेकांना रोजगार मिळाला.
दिवाळी संपताच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. उमेदवारांच्या प्रचार गाड्या सकाळपासूनच मतदारसंघात फिरत हाेत्या. तसेच कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात विकासकामांचा प्रचार करणारे पाॅम्प्लेट वाटले जात गेले. दुपारी छोटेखानी महिला मेळावे भरविले गेले. पत्रकांचे वाटप, प्रचारासाठी रिक्षा-टेम्पो आणि मांडव टाकणारे असे विविध हात निवडणुकीसाठी सरसावले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आणि त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. यामध्ये ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, पाॅम्प्लेट वाटणारे, हार विक्रेते, मंडप व्यावसायिक, झेंडे बनवणारे, सोशल मीडियासाठी लागणारे पोस्ट, महिला, खानावळी, हॉटेल, ॲडव्हर्टाइजमेंट बॅनर करणारे अशा विविध घटकांचा यात समावेश होता. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. प्रचार रॅलींमुळे फुलांना मागणी वाढली हाेती. हार, बुके माेठ्या प्रमाणावर विकले गेले. त्याचप्रमाणे सभा आणि रॅलीसाठी फेट्यांची विक्री झाली. ४० हजार आसन क्षमतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेला, पाऊस आणि उन्हापासून संरक्षण देणारा मंडप अनेकांनी उभारला होता. असा मंडप उभारण्यासाठीचा दर चौरस फुटाला ३ ते ४ हजार व त्यापेक्षाही जास्त असतो.
निवडणूक काळात अनेकांना रोजगार मिळाला. यामध्ये मंडप व्यावसायिकांना थाेडा जास्तच होता, असे मला वाटते. कारण सभा असो वा प्रचार रॅली, साऊंड सिस्टीम किंवा मांडव उभारणीसाठी कचेरीत मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत होती. ज्याठिकाणी मांडव उभारला त्याठिकाणी वायरिंगची गडबड होऊ नये यासाठी एकजण उपस्थित असायचा. त्याचा देखील रोजगार त्यांना द्यावा लागला. रिक्षा, प्रचाराच्या इतर गाड्यांना साऊंड सिस्टम जोडून देणे त्यातील सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी एकाची नेमणूक करावी लागली. यातून मांडव व्यावसायिकांसह अनेकांना रोजगार मिळाला आहे. - कैलाश शहाराम गव्हाणे, मंडप व्यावसायिक
मी अनेक घरी धुणीभांडी करते. त्यातून वेळ काढत प्रचारात देखील जात हाेते. कुठे आणि किती वाजता पोहोचायचे, याचा निरोप येत असे. त्यानुसार कामे आवरून सभास्थळी किंवा रॅलीच्या ठिकाणी पोहोचत हाेते. त्यातून चांगले पैसे गाठीशी मिळाले. - अर्चना वाघ, घर कामगार महिला