पुणे : शनिवारवाडा परिसरातील बांधकामाबाबत वस्तुस्थितीची माहिती गोळा करून, ती राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य शासनाकडून या भागातील बांधकाम नियमावलीत बदल करण्यासाठीची शिफारस घेऊन, केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री यांच्याबरोबर लवकरच बैठक बांधकामांचा प्रश्न सोडविण्यात येणार येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. या नियमावलीमुळे शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांसह काही इमारतींची पुर्ननिर्मिती थांबली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवलाखा- गायकवाड वाडा येथे स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन परिसराची पाहणी केली. यावेळी शनिवारवाडा कृती समितीचे प्रमुख सौरभ संजय पवार, सुहास कुलकर्णी, गणेश नलावडे, मुरलीधर देशपांडे, संदीप खर्डेकर, देवेंद्र सातकर, संदिप जयस्वाल, योगेश समेळ, योगेश खडके, पांडुरंग करपे, मुकुंद चव्हाण, अशोक येनपुरे, अश्विन होले आदी उपस्थित होते.
पुरातत्व विभागाच्या परिपत्रकामुळे पुण्याचा मध्यभाग असलेल्या शनिवार वाड्याच्या शंभर मीटर परिसरात नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती करता येत नाही. शहरातील अन्य ठिकाणीदेखील अशी समस्या येत असून, याबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. दरम्यान याबाबतचे पुरातत्व विभागाशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असल्याने त्याबाबतची माहिती घेऊन बांधकामांना स्थगिती नसल्यास पुरातत्व विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, त्यासाठी स्थानिकांना सोबत घेऊन दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात सद्यस्थितीला पाच सहा मजली बांधकामे झाली आहेत. त्यामुळे बांधकाम बंदीबाबत कायदा नव्हे तर ती नियमावली असल्याने, बांधकाम तज्ज्ञांना बोलावून येथील प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. शनिवारवाड्याच्या भिंतींना नवीन बांधकामांमुळे काही तोटा होणार नाही हे सद्यस्थितीला दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत अहवाल तयार करून, ही नियमावली का केली गेली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. तसेच शनिवारवाडा परिसरातील २०-२५ मीटर अंतरावरील बांधकामांना नियमावलीत दुरूस्ती करून परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी सुहास कुलकर्णी यांनी केली.