त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लवासा-बारामती यांना राज्य घोषित करावे लागेल ; गोपीचंद पडळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 05:36 PM2023-03-27T17:36:20+5:302023-03-27T17:36:31+5:30
लवासाच्या मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील तर बारामतीच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड करा
पुणे : बारामतीत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार व त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेची खिल्ली उडवली. आपल्या सभागृहातील बोलण्याचा दाखला देत पडळकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. त्यांची पंतप्रधान पदाची इच्छा पूर्ण करायची असेल तर लवासा मगरपट्टा व बारामती तीन राज्ये करावी लागतील असं ते म्हणाले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या युवा मोर्चा व युवा वॉरियर्सच्या ५२ शाखांच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. पडळकर म्हणाले की, ज्याचे चार खासदार असा माणूस पंतप्रधान होवू शकतो का. सभागृहात काही बोलायला गेलो तर ते राष्ट्रीय नेते आहेत असे सांगितले जाते. तुमचा आकडा शंभरच्या वर जात नाही. त्यांची पंतप्रधान पदाची इच्छा पूर्ण करायची असेल तर लवासा मगरपट्टा व बारामती तीन राज्ये करावी लागतील. लवासाच्या मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील तर बारामतीच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड करा. या राज्यांचा एक देश करुन त्यांचे पंतप्रधान शरद पवारांना करा.
त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री पद असून काहीच केले नाही - गोपीचंद पडळकर
राज्याचे नेतृत्व, केंद्र व राज्यातील सत्ता, चार वेळा मुख्यमंत्री पद असून देखील आधीच्या सत्ताधा-यांना दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. १९९५ ते ९९ या काळात राज्यात भाजप सेनेची सत्ता आल्यानंतर पाण्याचे नियोजन झाले. त्यानंतर १९९९ ते २०१४ पर्यंत उपसासिंचन योजनांची स्थिती जैसे थे अशीच राहिली.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उपसासिंचन योजनांना चालना दिली. मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या कालावधीत, त्यांनी विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र, मुंबई, खानदेश या सर्व भागांचा सारासार विचार करुन शेतक-यांसाठी नेमके काय लागेल याची योग्य उपाययोजना केली.