पुणे : आपण आज इंडिया ॲट ७५ म्हणतो, पण तरीही १७ टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. माझ्या स्वप्नातील भारत सुशासित, सुसंस्कृत व स्वानंदी असेल व तो भारत ॲट १०० मध्ये असेल. त्यातला एक दिवस मला जगायला मिळावा, असा दुर्दम्य आशावाद ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला.
डॉ. माशेलकर यांच्या ‘दुर्दम्य आशावादी- डॉ. रघुनाथ माशेलकर’ या चरित्रग्रथांचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी सायंकाळी त्यांचे गुरू व प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. एम. एम. शर्मा यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सिम्बायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार, वैशाली माशेलकर, लेखक डॉ. सागर देशपांडे, प्रकाशक स्मिता देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. माशेलकर यांच्यासारखा विद्यार्थी मिळणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती, अशा शब्दात प्रा. शर्मा यांनी डॉ. माशेलकर यांचे कौतुक केले. भारताच्या ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी आईच्या नावाने सुरू केलेला अंजनी माशेलकर पुरस्कार ही त्याची कृतज्ञता असल्याचे त्यांनी अखेरीस नमूद केले.