पुणे : ‘पुरुषोत्तम’ करंडक हातात घेणे, उंचावणे, त्याचा जल्लोष करणे यामध्ये एक वेगळा आनंद आहे. मात्र, पुरुषोत्तम उंचावण्यासाठी एकांकिकेचे जे निकष पार पाडावे लागतात त्या कसोटीवर एकही एकांकिका नव्हती. पहिला, दुसरा, तिसरा नंबर मिळाला तरी ‘करंडक’ उंचावता आला नाही ही सल कलावंतांच्या मनात राहावी आणि पुढे जाऊन पुरुषोत्तम उंचावण्यासाठी सर्व निकषांवर पात्र व्हावे यासाठी कलावंतांनी भविष्यात आणखी प्रयत्न करावेत, हीच करंडक न देण्यामागची भावना आहे, अशी भूमिका परीक्षक पौर्णिमा मनोहर यांनी मांडली.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये यंदा प्रथम क्रमांक दिला. मात्र, करंडक दिला गेला नाही. त्यावरून नाट्यक्षेत्रामध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यानिमित्त सुदर्शन रंगमंच येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रीय कलोपासक संघाचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई, ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे, परीक्षक पौर्णिमा मनोहर, परीक्षक परेश मोकाशी यांच्यासह स्पर्धेत सहभागी संघातील कलावंत, तंत्रज्ञ व नाट्यक्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेतला.महाजन म्हणाल्या की, स्पर्धा म्हटले की त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक दिला गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही स्पर्धेचे पारितोषिक व रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला; मात्र पुरुषोत्तम करंडक उंचावण्यासाठी नाटकांचे जे निकष लागतात त्या निकषात बसणारे एकही नाटक आम्हाला वाटले नाही. कलाकारांनी बक्षिसापुरते न राहता खरे नाटक शिकले पाहिजे याकडे जास्त लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दर्जा टिकून राहावा म्हणून नियम
आयोजकांनी नियमात बदल करावेत. कलावंतांच्या जनभावना पाहून नियमात लवचिकता असावी, अशा सूचना कलावंतांनी मांडल्या. त्याला उत्तर देताना ॲॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले की, पुरुषोत्तम सुरू झाला तेंव्हा इतके नियम नव्हतेच. मात्र, स्पर्धेेचा वाढता प्रतिसाद पाहता स्पर्धेतील दर्जा टिकून राहावा, शिस्त राहावी यासाठी नियम होत गेले. ते नियम जसे कलावंतांसाठी आहे तसेच ते नियम परीक्षक व आयोजकांसाठीसुद्धा आहेत. त्यामुळे साऱ्यांनीच सर्व नियम पाळणे गरजेचे आहे.
कलाकारांनी करंडकाचा मान उंचावला
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने किंवा महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने आजपर्यंत एकही कलाकार घडविलेला नाही. जब्बार पटेल, सोनाली कुलकर्णी यांच्यासारख्या अनेक कलावंतांमध्ये नाट्य क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याची धमक आणि ऊर्मी होती म्हणून ते मोठे झाले. पुढे जाऊन त्यांनी मत मांडले की, पुरुषोत्तममुळे आम्ही घडलो. त्यामुळे पुरुषोत्तमचा मान वाढला आहे. त्यामुळे यंदा पुरुषोत्तम मिळाला नाही म्हणून खूप मोठे संकट कलाकारांवर आले आहे किंवा कलाकार घडणार नाहीत, असे मानण्याचे कारण नाही, असा समारोप ॲॅड. राजेंद्र ठाकूर देसाई यांनी केला आणि चर्चासत्राचा समारोप झाला. मात्र, तास-दोन तासांच्या चर्चासत्रानंतरही अनेक प्रश्न रेंगाळत राहिले.