गोरख माझिरे/लोकमत न्यूज नेटवर्कभूगाव : आज रस्त्याने जाता-येता तरुण मुले-मुली अगदी स्टाईलमध्ये सिगरेट ओढताना दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस ‘तंबाखू सेवन विरोधी दिन’ जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून घोषित केला असला तरी, तंबाखू, गुटखा आणि सिगरेट यांचे सेवन आणि विक्रीचे प्रमाण ‘जैसे थे’च आहे. व्यसनमुक्तीसाठी गुटखाविक्रीवर बंदी असूनही बाजारात सर्रास याची विक्री होताना दिसून येते.ग्रामीण भागात सिगरेटपेक्षा गुटखा, तंबाखू यांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: तरुण मुला-मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांमध्येही तंबाखू जाळून त्याची मिसरी करून दातांना आणि हिरड्यांना लावली जाते. तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीमुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडतात.तंबाखू सेवनाने हृदय, फुप्फुस, अन्ननलिका, किडनी, आतडे, यकृतासारख्या मुख्य अवयवांवर वाईट परिणाम होणारे रोग उद्भवतात. या प्रकाराचे धोके लक्षात घेऊन सर्वांनीच त्यापासून दूर रहावे. महाराष्ट्रामध्ये विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे.तंबाखूमधील निकोटीन खूपच घातक व मारक आहे. तंबाखू मग ती खाण्याची असो की, बिडी किंवा सिगारेटमधून ओढण्याची यात निकोटीनचे हे अंत्यत घातक, मारक रसायन असते, जे तोंडापासून ते लहानमोठ्या आतड्यांपर्यंतच्या कॅन्सरचे कारण बनते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे किंवा बिडी सिगारेटच्याद्वारे ओढणे म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळणे होय. तंबाखू खाण्याची सवय सोडण्यासाठी मनाचा निर्धार पक्का करा. तंबाखू स्वत: खाऊ नका, बिडी, सिगरेट ओढू नका व इतरांनाही ओढू देऊ नका, बिडी, सिगरेट ओढणाऱ्यांच्या संपर्कात राहू नका किंवा संपर्कात येऊ नका.तबांखूसेवन व सिगरेट ओढणाऱ्यांचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. आज ‘जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिना’ निमित्त नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये कामाच्या ताण-तणावामुळे धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: तरुण मुला-मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. साधारणत: २० ते ३५ वयोगटांतील तरुणांमध्ये येणाऱ्या हृदयविकारांमध्ये ३० टक्के हृदयविकार हे तंबाखूमुळे होतात. भविष्यात मानसिक त्रास व अन्य त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे. हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.-डॉ. अभय सोमाणी, हृदयविकारतज्ज्ञ, पुणे
तरुणांमध्ये वाढतेय तंबाखू सेवनाचे प्रमाण
By admin | Published: May 31, 2017 1:36 AM