पुणे : शेतकरीविरोधी कायदे हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती पुणेतर्फे बुधवारी (दि. २६) काळा दिवस पाळण्यात येणार आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने, तसेच मोदीसरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून काळा दिवस पाळण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन कायदे संमत केले. त्यानुसार शेतमाल उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतची सर्व प्रक्रिया केंद्र सरकारने मोठ्या कंपन्यांसाठी खुली केली आहे. त्यामुळे शेतीक्षेत्र आणि शेतकरी रसातळाला जात आहे. त्याविरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहा महिन्यांत साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी प्राण गमावले आहेत. या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असताना बुधवारी काळा दिवस पाळण्यात येणार आहे, असे लोकायततर्फे कळविण्यात आले आहे. काळे कपडे घालून किंवा काळी फित बांधून ‘शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा’ या विषयावरील मत लिहून छायाचित्रासह किंवा व्हिडीओ काढून ७९७२३४५७६४ या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.