पुणे : केंद्र सरकारने आखलेल्या नव्या लसीकरण धोरणानुसार, पुणे महापालिकेने आजपासून ( बुधवार दि. २३ जून) १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. आज ५३ केंद्रांवर ५ हजार ३०० जणांचे लसीकरण होईल, असे नियोजन महापालिकेने केले आहे.
पुणे महापालिका हद्दीत १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
१८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाकरिता पहिल्या दिवशी ५३ केंद्रांना प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रत्येक केंद्रांवर ७० टक्के डोस हे ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंग केलेल्या नागरिकांना, तर ३० टक्के डोस हे ‘ऑन स्पॉट’ नोंदणी करुन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ऑनलाईन नोंदणी बुधवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे.