पुण्यात विना उमेदवार काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 02:53 PM2019-03-31T14:53:21+5:302019-03-31T18:36:46+5:30
पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती
पुणे : पुणे लोकसभेसाठी रविवारी सुट्टीचा योग साधून काँग्रेसने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी फटाक्यांची आताषबाजी, बँड वादन, पक्षाचे झेंडे, गली गली में शोर हे चौकीदार चोर है सारख्या घोषणा यांनी काँग्रेसच्या प्रचाराचा सुरुवात झाली. पक्षाकडून कुणाही उमेदवाराची घोषणा न झाल्यामुळे विना उमेदवार आणि सर्व इच्छुक उमेदवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह रविवारी सायंकाळी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पक्षाच्या वाटचालीस सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे अभय छाजेड , रमेश बागवे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड , अरविंद शिंदे, यांच्यासह राष्ट्रवादीकडून खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, आदी नेते उपस्थित होते.
काँग्रेस नेतृत्वाने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसचा प्रचाराचा नारळ उमेदवाराशिवाय फोडण्याची तयारी करण्यात आली आहे. उमेदवार नसला तरी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढण्यात येईल, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट केले होते.
पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार शहर काँग्रेसने रविवारी सुट्टीची संधी साधून प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन केले होते. दुपारी ४.१५ वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढली जाणार आहे. पण दुपारी अडीच वाजेपर्यंत दिल्लीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्याने प्रचाराचा नारळ कसा फोडायचा, असा प्रश्न कार्यकर्ते विचारू लागले आहेत. उमेदवारशिवाय प्रचाराला सुरूवात केल्यास विरोधकांकडून त्याचे भांडवल केले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
शहराध्यक्ष बागवे यांनी मात्र प्रचार फेरी निघणारच, असे स्पष्टपणे सांगितले. उमेदवाराची घोषणा झाली नाही, तरी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली जाणार आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन फेरीत केले जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्यातूनच प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. त्वष्टा कासार मंदिर, पवळे चौक, साततोटी चौक, फडके हौद, आरसीएम गुजराथी हायस्कूल या मागार्ने पदयात्रा जाणार असून नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ समारोप होईल. पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकतेर्ही या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.