पुणे: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वादग्रस्त तीन कृषी कायदे (agriculture bill) रद्द करत असल्याची घोषणा केली. मागील जवळपास एक वर्षापासून हे कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन (farmer protest against Farm Bills 2020) करत होते. हे कायदे रद्द झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पंतप्रधानांच्या (narendra modi) या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर कुणी उशीरा सुचलेले शहानपण असंही या निर्णयाला संबोधलं आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau Khot) यांनी इतिहासात आजच्या दिवसाची "सर्वात काळा दिवस" अशी नोंद होईल, ही प्रतिक्रिया फेसबूक पोस्ट करून दिली आहे. तुम्ही जर तुमचं भल करणाऱ्याच्या मागं भक्कम उभं राहिला नाहीत तर तुमच्या जीवावर उठणारे जिंकतात, असंही खोत म्हणाले आहेत.
पुढे सदाभाऊ खोत म्हणतात, तीन कृषी कायदे मागे घेण्याची दुर्दैवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हा आघात शेतकऱ्यांना सहन होण्यापलिकडचा आहे. आता कोठे शेतकऱ्यांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची चार किरणे पसरण्याची शक्यता तयार झाली होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या अभद्र युतीने ही अंधुकशी शक्यताही हाणून पाडली. गेले वर्षभर अपप्रचाराचा गदारोळ उठवून शेतकरी स्वातंत्र्याच्या नरडीचा घोट घेण्यात तीनही पक्ष यशस्वी झाले आहेत.
खरेतर केंद्र सरकारने आतापर्यंत ठामपणे या शेतकरी विरोधी पक्षांना दाद दिली नव्हती. पण अखेरीस केंद्र सरकार नमले. कदाचित आगामी निवडणुका लक्षात घेऊन केंद्राने हे पाऊल उचलले असेल. पण हा निर्णय चुकीचा आहे. शेतकर्यांना पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या पाताळात गाडणारा आहे.
पुढे बोलताना खोतांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आता परत एकदा नव्या जोमाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची कत्तल सुरू करतील. राजकीय दलाल आणि अडत्यांचे शेतकऱ्यांना लुटणारे अड्डे बळकट होतील. मार्केट कमिटीतील शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या जळवांनी आता सुटकेचा निःश्वास टाकला असेल. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या फौजा नव्या जोमाने शेतकऱ्यांच्या वावरात शिरतील. त्याचा घाम गाळून पिकवलेला शेतमाल हव्या त्या दरात लुटून नेतील, असा घणाघात खोतांनी कृषी कायदे रद्द झाल्यांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे.