पुणे/येरवडा : विश्रांतवाडी ते संगमवाडीदरम्यानच्या बीआरटीबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारी व वाहतुकीला होत असलेल्या अडथळ्याबाबत काहीही उपाययोजना न करताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. ३०) या मार्गाचे उद्घाटन होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आज सकाळी बीआरटी मार्गाची पाहणी केली. या मार्गाच्या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी अनेक समस्या आयुक्त कुणाल कुमार यांच्या भेटीदरम्यान मांडल्या होत्या. या समस्या सोडविण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले होते. मात्र अद्याप याबाबत काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तरीही उद्घाटन कार्यक्रम आयोजित केल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्या हस्ते उद्या (रविवार) सकाळी ८ वाजता शहरातील बहुचर्चित बीआरटी मार्गाचे डेक्कन कॉलेज बसस्टॉप परिसरात उद््घाटन होत आहे. संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गावरील स्थानकांवरून जे प्रवासी चढ-उतार करतील अशा प्रवाशांनाच पुणे स्टेशन ते विश्रांतवाडी, विश्रांतवाडी ते पुणे स्टेशन तसेच मनपा ते विश्रांतवाडी आणि विश्रांतवाडी ते मनपा असा प्रवास मोफत दिला जाणार आहे. मात्र जे प्रवासी बीआरटी कॉरिडॉरच्या अगोदर चढ-उतार करतील, ज्यांचा प्रवास बीआरटी कॉरिडॉरमध्ये होणार नाही, अशा प्रवाशांना तिकीट आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) वाहतूक व्यवस्थापक कैलास गावडे यांनी दिली. संगमवाडी ते विश्रांतवाडी हा बीआरटी मार्ग ३० आॅगस्टपासून सुरू होणार आहे. या मार्गावर दर ५ ते १० मिनिटांनी बस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सरासरी ३ मिनिटांना बसचा प्रवास करता येणार आहे. तसेच विश्रांतवाडी स्थानकातून पुढील भागांमध्ये प्रवाशांसाठी इतर मार्गावर स्वतंत्र बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बीआरटी कॉरिडॉरमध्ये चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांनाच मोफत प्रवास करता येणार असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे. कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी व पुणे स्टेशन ते विश्रांतवाडी या मार्गावर दर पाच मिनिटाला तर स्वारगेट ते विश्रांतवाडी आणि मनपा ते विश्रांतवाडी या मार्गावर दर १० मिनिटाला बस सोडण्यात येणार आहे. या मार्गांवर एकूण ५८ बस धावणार आहेत. विश्रांतवाडीवरून अन्य ठिकाणी जाणाऱ्या बसची संख्याही वाढविली असून, वेळही कमी करण्यात आली असल्याचे गावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पादचारी पुलाच्या लिफ्ट कशासाठी ?गेल्या दीड वर्षांपूर्वी अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते विश्रांतवाडीतील पादचारी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या वेळी दिखाव्यासाठी केवळ उद्घाटनाच्या दिवशी पादचारी पुलाच्या तिन्ही बाजूंकडील लिफ्ट सुरूकरण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून बंद असलेल्या या लिफ्ट आजही सुरू झालेल्या नाहीत. कदाचित रविवारी पुन्हा या लिफ्ट सुरूकेल्या जातील. केवळ मान्यवरांना दाखवण्यासाठीच या लिफ्ट बसवल्या आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. या पुलाच्या कामासाठी पालिकेने तब्बल साडेसहा कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. या व्यतिरिक्त बीआरटी मार्गात अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सोय करण्यात आलेली नाही. विश्रांतवाडीत दररोज होणारी प्रचंड वाहतूककोंडी आदी समस्याही कायम आहेत.
समस्या न सोडविताच आज बीआरटी मार्गाचे उद्घाटन
By admin | Published: August 30, 2015 3:08 AM