पुणे : शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाइन पद्धतीने आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील ९६ हजार ६८४ जागांसाठी आत्तापर्यंत २ लाख १३ हजार ११४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील १४ हजार जागांसाठी ५३ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. प्रवेश अर्ज करण्याचा मंगळवारी (दि.३०) अंतिम दिवस आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. शिक्षण विभागाने अर्जासाठी ३० मार्चपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, शाळांना आरटीई शुल्क परतावा न मिळाल्यामुळे यंदा प्रवेशप्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संस्थाचालक संघटनेने घेतला आहे. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे बहुतांश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय पालकांनी आरटीई प्रवेशातून आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, या उद्देशाने मोठ्या संख्येने ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज केला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु, कोरोनामुळे काही पालकांना अर्ज भरण्यास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातर्फे प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. परंतु, क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यामुळे शिक्षण विभागातर्फे मुदतवाढ दिली जाणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
---
प्रमुख शहरांतील आरटीई प्रवेश अर्जांची आकडेवरी
जिल्हा जागा प्राप्त अर्ज
औरंगाबाद ३,६२५ ११,३६६
नागपूर ५,७२९ २३,६४९
नाशिक ४,५४४ १२,८०२
पुणे १४,७७३ ५३,५३८
ठाणे १२,०७४ १८,१४०
मुंबई ५,२२७ १२,३७५