पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मंगळवारी (दि.१५) अंतिम दिवस आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत राज्यातील ६२ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून पुढील ८ ते १० दिवसांनंतर आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्यातील सर्वाधिक १० हजार प्रवेश पुणे जिल्ह्यात झाले आहे.राज्यातील ९ हजार ३३१ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील १ लाख १५ हजार ४६० जागांसाठी राज्यातील २ लाख ९१ हजार ३६८ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची आॅनलाइन लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी निवड करण्यात आली. मार्चपासून निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया बरीच लांबली होती. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची सुधारित नियमावली प्रसिद्ध करून त्यानुसार पालकांना पाल्याचा प्रवेश निश्चीत करण्याची सूचना केली होती. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे प्रवेशाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली.शिक्षण विभागातर्फे येत्या ८ ते १० दिवसांनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. सुमारे ७५ हजार विद्यार्थी आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिले जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.- पुणे जिल्ह्यातील ९७२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील १६ हजार ९४९ जागांसाठी ६२ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले होते. लॉटरीच्या माध्यमातून १६ हजार ६१७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातील १० हजार १६३ विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित केला.
आरटीई प्रवेशाचा आज अंतिम दिवस, सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 2:09 AM