हनुमंत देवकरचाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. महाशिवरात्रीच्या उपवासामुळे भाज्यांना उठाव झाला नाही. तरकारी बाजारात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी आदी भाज्यांना २ रुपये ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. मेथीच्या गड्ड्या पडून राहिल्या, तर काकडी, वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, गाजर, भोपळा आदी भाज्या सणामुळे मार्केटमध्ये शिल्लक राहिल्या. शिल्लक राहिलेल्या भाज्या अडत्यांनी झाकून ठेवल्या आहेत. भाज्यांचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.चाकण येथील मार्केट यार्ड मधील तरकारी विभागात मोठ्या प्रमाणावर आवक होऊन भाज्यांचे भाव गडगडले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांसह कोथिंबीर व मेथीची बाजारात मोठी आवक झाली.भाज्यांना प्रतिकिलोस मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :- कोबी - २ ते ३ रुपये, फ्लॉवर - २ ते ३ रुपये, टोमॅटो - २ ते ३ रुपये, दुधी भोपळा - ३ ते ५ रुपये, वांगी - ४ ते ५ रुपये, लाल भोपळा - ३ ते ८ रुपये, वालवर - ७ ते ८ रुपये, काकडी - १० ते १२ रुपये, गाजर - ७ ते ८ रुपये, वाटाणा - १५ ते २० रुपये, बिट - ३ ते ५ रुपये, रताळी - ८ ते १२ रुपये.तेजीत असलेल्या भाज्या :- ढोबळी - २२ ते २५ रुपये, भेंडी - २५ ते ३० रुपये, गवार - २५ ते ३० रुपये, फरशी - २५ ते ३० रुपये, शेवगा - ३० ते ३५ रुपये, हिरवी मिरची - ३० ते ३५ रुपये,पालेभाज्यांचे जुडीचे भाव पुढीलप्रमाणे :- मेथी - १ ते २ रुपये, पालक - १ ते २ रुपये, कोथिंबीर - १ ते २ रुपये, शेपू - २ ते ३ रुपये.
चाकण बाजारात महाशिवरात्रीमुळे मंदी, आज पुन्हा भाज्यांचे भाव गडगडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 3:28 PM