घोडेगाव : घोडेगावचे ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव मंदिराची यात्रा दर वर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी उत्साहात साजरी होत आहे. पुरातन व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे मंदिर असून, यात्रेला दर वर्षी मोठी गर्दी होत असते. श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाताना घोडेगाव शहरात रस्त्यालगत हे पुरातन मंदिर आहे. निसर्गरम्य अशा ओढ्याच्या बाजूला डोंगराच्या कपारीत दगडात कोरलेले हे मंदिर एका मोठ्या विहिरीवर उभे केले आहे. या मंदिरात असलेल्या शिवलिंगाच्या बाजूला जिवंत पाण्याची दोन कुंडे आहेत.
या कुंडातून शिवलिंगावर सतत पाणी येत असते. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हे पाणी मोटारीच्या सहाय्याने उपसावे लागते. पाणी काढल्यानंतर काही वेळातच पुन्हा पिंडीवर पाणी येते, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. तसेच या मंदिराच्यासमोरही एक कुंड आहे व बाजूला ओढा वाहत आहे. गुहा मंदिरात अनेक तपस्वींनी तपस्या केली आहे. पूर्वी येथे साबरबन वृक्षाचे शाखिन्य नावाचे दाट जंगल होते. या जंगलात कपालेश्वर नावाच्या साधुने येथील गुहेत तपस्या केली होती. तसेच राजा हरिश्चंद्र फिरत असताना येथे आले होते, येथे त्यांनी खोल दगडात पाच लिंगे ठेवली. येथून पुढे हे श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले, अशी कथा या मंदिराबाबत सांगितली जाते. वर्षानुवर्षांपासून घोडेगावच्या या ग्रामदैवताची यात्रा श्रावण महिन्यात तिसºया श्रावणी सोमवारी साजरी केली जाते. याही वर्षी यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सोमवारी (दि. २७) धार्मिक विधी व गावातून हारतुºयांची मिरवणूक होणार आहे. मंगळवारी (दि. २८) भजन स्पर्धा व कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे.सध्या या पाच लिंगांवर पिंड आहे. या पिंडीवरील शाळुंका काढली असता सुमारे चार फूट खोल खळग्यात या छोट्या पाच लिंगांचा स्पर्श होतो. या पिंडीवरची शाळुंका क्वचितच काढली जाते. या मंदिरामध्ये महंत गगनगिरीमहाराज, महंत नर्मदागिरी महाराज, महंत रामगिरीमहाराज, महंत गणेशगिरी महाराज या साधुंनी धार्मिक कार्य करून मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम केले आहे. सध्या महंत सेवागिरीमहाराज हे देवाची सेवा करीत आहेत. मंदिरात संत तुकाराममहाराज यांची कीर्तने झाली आहेत. तसेच या मंदिरास लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या थोर व्यक्तींनी भेट दिली आहे. भीमाशंकरकडे जाणारे भाविक दर्शनासाठी येथे आवर्जून थांबतात. देवस्थानानेही येथे भाविकांना थांबण्यासाठी व्यवस्था केली आहे.