पुणे : सरल संगणकप्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी सोमवारी अंतिम मुदत आहे. या माहितीच्या आधारे संचमान्यता केली जाणार असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरणे आवश्यक आहे. दरम्यान, अद्यापही अनेक शाळांमधील काही विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणालीवर भरणे बाकी आहे. आधारमधील गोंधळ व संकेतस्थळ सातत्याने हँग होत असल्याने दिवाळीच्या सुटीतही शिक्षकांना धावाधाव करावी लागली.राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय व खासगी शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल’ संगणकप्रणालीच्या माध्यमातून संकलित केली जात आहे. आधार कार्ड क्रमांकासह सर्व माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रणालीवर नोंद झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे संच मान्यता केली जाणार आहे. सुरुवातीला माहिती भरण्यासाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, संकेतस्थळातील तांत्रिक बिघाड, आधार कार्डवरील चुकीची माहिती अशा विविध कारणांमुळे या मुदतीत माहिती भरण्यात अडचणी आल्या. परिणामी शिक्षण विभागाला तीन वेळा माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी लागली. आता ही मुदत दि. २३ आॅक्टोबर असून माहिती भरण्यासाठी केवळ एकच दिवस उरला आहे.संकेतस्थळ हॅँगविद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना दिवाळीच्या सुटीतही काम करावे लागले. काही शिक्षकांनी घरी हे काम केले. तरीही सातत्याने संकेतस्थळ हँग होत असल्याने माहिती पूर्णपणे भरून झाली नसल्याची तक्रार काही शिक्षकांनी केली आहे.दरम्यान, संबंधित संकेतस्थळावर ‘स्टुडंट्स अपडेशन’ ही सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत असल्याचा संदेश झळकत आहे. शाळेच्या स्टुडंट पोर्टलवरील दि. २३ तारखेच्या माहितीच्या आधारे संचमान्यता करण्यात येणार असल्याने यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी केवळ दहावीचे वर्ग वगळता ही सुविधा बंद करण्यात येणार आहे.
सरल संगणकप्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी आज अंतिम मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:32 AM