पुणे : गेल्या काही वर्षांपासून हडपसरचा झपाट्याने विकास होत आहे. एकेकाळी ‘भाजीपाल्याचे कोठार’ म्हणून ओळखले जाणारे हडपसर आता ‘आयटी हब’कडे वाटचाल करीत आहे. या प्रगतीच्या प्रवासात सक्रिय साक्षीदार असलेल्या ‘लोकमत’ने १४ वर्षांपासून येथील नागरिकांच्या आशा-आकांक्षाना बळ दिले आहे. वाचकांशी असलेला हा ऋणानुबंध आणखी घट्ट करण्यासाठी हडपसर येथे उद्या पहिल्या श्रावणी सोमवार या मंगलदिनी ‘लोकमत’ पूर्व विभागीय कार्यालय सुरू होत आहे. उद्घाटन महापौर चंचला कोद्रे व उपमहापौर बंडू गायकवाड यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता मेगा सेंटर हडपसर येथे होत आहे. माहिती-तंत्रज्ञानापासून अन्नप्रक्रिया उद्योगापर्यंत अनेक प्रकारची कारखानदारी येथे वाढली आणि त्यातूनच उद्योजकतेचे नवे प्रयोग घडत आहेत. हडपसरच्या नागरिकांच्या सोयीसाठी सुरू होणारे पूर्व विभागीय कार्यालय हे पुणे जिल्ह्यातील आठवे कार्यालय असणार आहे. पूर्व भागातील वाचकांसाठी, जाहिरातदारांसाठी, विक्रेत्यांसाठी या कार्यालयामुळे फायदा होणार आहे. या परिसरातील नागरिकांना आपली मते, सूचना व तक्रारी मांडण्यासाठी ‘लोकमत’चे हे कार्यालय म्हणजे खुले व्यासपीठच असणार आहे. उद्घाटनाला सन्माननीय अतिथी मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व रांका ज्वेलर्सचे संचालक अॅड. फत्तेचंद रांका, गेनबा मोझे शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, एअरपोर्ट अॅथॉरिटी पुणेचे संचालक मनोज गंगाल उपस्थित राहणार आहेत़ सर्वांनी कार्यक्रमाला आर्वजून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी केले आहे़(प्रतिनिधी)
लोकमत पूर्व विभागीय कार्यालयाचे आज उद्घाटन
By admin | Published: July 28, 2014 4:49 AM