लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेलगतच्या ३४ गावांचा पालिकेत समावेश करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. उच्च न्यायालयात गावांच्या समावेशाबाबत अंतिम प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करावयाचे आहे, त्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे संचालक आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पायाभूत सुविधांचा अभाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा विचार करता ही गावे त्वरित महापालिकेत समाविष्ट करणे योग्य ठरेल, असा अहवाल शासनाला दिला आहे. त्यामुळे आता राज्य शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शासनाने २४ मे २०१५ मध्ये हद्दीलगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागवून सुनावणी घेण्यात आली. मात्र या निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने हद्दीलगतच्या गावातील ग्रामस्थांनी ३४ गावांचा तातडीने महापालिकेत समावेश करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान याबाबत राज्य शासन अनुकूल असल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात सादर केले. त्यानुसार गावांचा समावेश करण्याबाबतचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांची ३४ गावांच्या समावेशाबद्दल आज बैठक
By admin | Published: June 21, 2017 6:23 AM