पुणे : दोन महापालिकांची सत्ता हातातून गेल्यानंतर गायब झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी पुण्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची बैठक होत आहे. बारामती होस्टेल येथे सकाळी ९ वाजता ही बैठक होणार असून त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारही तिथे येणार आहेत; मात्र ते बैठकीला उपस्थित राहतील किंवा नाही, त्याविषयी साशंकता आहे.पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण या बैठकीला पूर्र्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित नसतील, अशी माहिती मिळाली. निवडणुकीपूर्वी पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. महापालिका निवडणुकीत या दोन्ही ठिकाणी पक्ष सत्तेतून पायउतार झाला आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून खासदार चव्हाण यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे तेही पद रिक्तच आहे. शहराध्यक्ष पदासाठी काही जणांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘नॉट रिचेबल’ अजित पवार प्रथमच घेणार बैठकमहापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सलग १० दिवस अजित पवार ‘नॉट रिचेबल’ होते. आता निकालानंतर प्रथमच त्यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच काही ज्येष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित असतील. त्यात पक्षाच्या पराभवाची कारणमिमांसा होणार आहे. स्वत: पवार नेते व ज्येष्ठ नगरसेवकांबरोबर वैयक्तिक चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. पुण्यात पवार यांनी काही नगरसेवकांवर निवडणुकीची विशिष्ट जबाबदारी सोपविली होती. त्यात हे पदाधिकारी कमी पडल्याने त्यांच्याकडे विचारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर पवार यांचा रोख लक्षात घेऊन पक्षाला महापालिकेत मिळणाऱ्या विरोधी पक्षनेते पदाबाबतही चर्चा केली जाणार आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आज बैठक
By admin | Published: March 05, 2017 4:37 AM