बारामती / पौढ : जिल्ह्यातील माळेगाव व संत तुकाराम सहकारी साखर कारखाच्या निवडणुकीसाठी गुरूवारी (दि. २ एप्रिल) सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. माळेगावच्या निवडणुकीसाठी ३९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर देखरेख करण्यासाठी एकूण ६ झोनल आॅफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान करतेवेळी मतदाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास शाई लावण्यात येईल.मुळशी, मावळ, खेड, शिरूर, हवेली या पाच तालुक्यांत श्री संत तुकारामसाठी मतदान होत आहे. त्यासाठी ४२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर सात याप्रमाणे एकूण २९४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाचही तालुक्यांत झोनल अधिकारीही नियुक्त केले आहेत. एकूण सतरा हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तथापि, त्यातील अडीच ते तीन हजार मतदार मयत आहेत. अवैध मतदान रोखण्यासाठी प्रशासन पातळीवर कडक इशारे देण्यात आले आहेत.जे मतदार दोन्ही कारखान्यांचे मतदार आहेत, अशा मतदारांना संत तुकाराम साखर कारखान्यासाठी मतदान करून आल्यानंतरही माळेगाव कारखान्यासाठी मतदान करता येईल. मात्र, त्यासाठी संत तुकाराम कारखान्याचे ओळखपत्र दाखविणे अनिवार्य असेल.(वर्ताहर)
संत तुकाराम, माळेगाव कारखान्यासाठी आज मतदान
By admin | Published: April 02, 2015 5:53 AM