नारायणगाव : निवडणूक आचारसंहिता असल्याने शिवजयंतीनिमित्त दर वर्षी होणारा शिवप्रेमींचा मेळावा उद्या रविवारी शिवनेरी पायथ्याशी न होता, शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत होणार आहे़ दर वर्षी दिला जाणारा मानाचा ‘शिवनेर भूषण’ पुरस्काराचे स्वरूप या वर्षापासून बदलण्यात आले आहे. या वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़ यावर्षी विविध क्षेत्रातील ८ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़, अशी माहिती किल्ले शिवनेर परिसर विकास समितीचे अध्यक्ष तथा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली़दर वर्षी ‘शिवनेर भूषण पुरस्कार’ एकाच मान्यवराला देण्यात येत असे़ मात्र, या वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़ यामध्ये शहीद मेजर प्रमोद महाबरे यांना ‘शिवनेर भूषण २०१७’ हा पुरस्कार देऊन त्यांची पत्नी व कुटुंबीयांना सन्मानित करण्यात येणार आहे़. तसेच, शहीद मेजर प्रमोद महाबरे यांचे कुटुंबीय व मुलांच्या शिक्षणासाठी आमदार शरद सोनवणे व कुलस्वामी को़ आॅप़ क्रेडिट सोसायटी लि़. यांच्या वतीन ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. ही रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी ठेव पावतीद्वारे डिपॉझीट केली जाणार आहे़ या पुरस्काराबरोबरच ‘शिवनेर भूषण प्रतिभावंत महिला पुरस्कार २०१७’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राजश्री बोरकर, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब उर्फ महादेव गुंजाळ यांना ‘शिवनेर भूषण शैक्षणिक कार्य पुरस्कार ’, प्रगतिशील शेतकरी मुरलीधर शंकरराव काळे यांना ‘शिवनेर भूषण आदर्श शेतकरी पुरस्कार’, पत्रकारक्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे भरत अवचट यांना ‘शिवनेर भूषण प्रतिभावंत पुरस्कार’, वारकरी सांप्रदायिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे विष्णुपंतमहाराज ढमाले यांना ‘शिवनेर भूषण सांप्रदायिक प्रतिभावंत पुरस्कार’, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे़ एल़ वाबळे यांना ‘शिवनेर भूषण सामाजिक योगदान पुरस्कार’ व आधुनिक शेती करून महिलांना शेतीसाठी प्रेरणा देणाऱ्या सुंदराताई उर्फ सुमित्रा कुऱ्हाडे यांना ‘शिवनेर भूषण महिला उद्योेजकता पुरस्कार’ असे आठ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़ दर वर्षी किल्ले शिवनेरीवर माता जिजाऊ व बालशिवाजी यांना अभिवादन व विविध कार्यक्रम झाल्यानंतर, जुन्नर शहरातील किल्ले शिवनेरी पायथ्याशी होणारा शिवपे्रमींचा मेळावा यावर्षी आचारसंहिता असल्याने होणार नाही़ मात्र, किल्ले शिवनेरीवर मर्दानी खेळ, जन्मसोहळा, मानवंदना आदी कार्यक्रम होणार आहेत़
शिवनेरीवर आज शिवप्रेमींचा मेळावा
By admin | Published: February 19, 2017 4:32 AM