राजेवाडी : पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे राजेवाडी, वाघापूर, आंबळे, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या गावांनी विमानतळाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर, या सर्व गावांतील ग्रामस्थ उद्या (दि. १३) जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकणार आहेत. सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसभेचे ठराव जिल्हाधिकारी सौरभ राव यांना प्रत्यक्ष देऊन ‘विमानतळ आम्हाला नको. ज्यांना गरज आहे त्यांना विमानतळ द्या,’ असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. विमानतळाला आम्ही इंचभर जमीन देणार नसल्याचे ठरावात नमूद केले आहे. सातही गावांतील शेतकरी, महिला, तरुण शेतकरी, लहान मुले या मोर्चात सहभागी होतील. पुरंदर तालुका कायम दुष्काळी होता; मात्र पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे राजेवाडी, पारगाव पंचक्रोशीत बारमाही बागायती जमिनी झाल्या असून, दुष्काळी भागातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता लाखो रुपये उसनवारीने बँकेकडून घेऊन शेती सुधारून फळबागा, फुलबागा लावून, रात्रंदिवस काबाडकष्ट करून लाखो रुपये कमवायला सुरुवात केली आहे. अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरू यासारख्या फळबागा लावून उत्पन्न कमवू लागले असताना शासनाने हा विमानळाचा नवा घाट घातल्याची ग्रामस्थांची भावना आहे. पुरंदर तालुक्यात विमानतळाची गरज नसताना उगाच हे भूत शेतकऱ्यांच्या माथी मारू नये व शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा ग्रामसभेत संताप नोंदविला आहे. हा मोर्चा गुरुवारी असल्याने राजेवाडीचा आठवडेबाज बंद राहणार असल्याचे सरपंच पुष्पांजली बधे यांनी सांगितले. (वार्ताहर)
विमानतळाविरोधात पुरंदरच्या सात गावांचा आज मोर्चा
By admin | Published: October 13, 2016 2:19 AM