पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची अनुभूती देणा-या ६५व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या सुरेल स्वरयज्ञास आजपासून (दि. १३) प्रारंभ होत आहे. बुजुर्ग दिग्गजांबरोबरच उदयोन्मुख कलाकारांचा आविष्कार असलेल्या या महोत्सवात रविवारपर्यंत (१७ डिसेंबर) पाच दिवसांचा स्वरयज्ञ कानसेन रसिकांना अनुभवावयास मिळणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर आयोजित या महोत्सवाचे यंदा ६५वे वर्ष आहे. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये तब्बल २८ कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. भारतीय संस्कृतीमध्ये शुभकार्याचा प्रारंभ मंगल वाद्याच्या वादनाने करण्याची प्रथा आहे. त्यानुसार दुपारी ३ वाजता मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मूळचे दिल्लीचे आणि सध्या इंग्लंड येथे वास्तव्यास असलेले आणि काही काळ भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे मार्गदर्शन लाभलेले डॉ. विजय राजपूत यांचे गायन होईल. त्यानंतर कोलकात्याचे देबाशिष भट्टाचार्य यांचे चतुरंगी (स्लाईड गिटार) वादन होईल. भट्टाचार्य हे अजय चक्रवर्ती आणि पं. ब्रिजभूषण काब्रा यांचे शिष्य आहेत. त्यानंतर बनारस घराण्याचे पं. राजन-साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे. पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. महोत्सवाच्यानिमित्ताने रसिकांची संगीतविषयक जाण वाढविण्याच्या उद्देशातून ‘अंतरंग’ आणि ‘षड्ज’ हे उपक्रम आयोजित केले जातात. कलाकाराशी संवाद असे स्वरूप असलेल्या ‘अंतरंग’मधून त्या कलाकाराची जडणघडण आणि त्याचे सांगीतिक विचार रसिकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी (दि. १३) ‘षड्ज’ अंतर्गत भास्कर राव दिग्दर्शित ‘म्युझिक आॅफ इंडिया’ (इंस्ट्रुमेंटल) हा लघुपट दाखविण्यात येईल. त्यानंतर प्रमोद पाटील यांनी दिग्दर्शित केलेला ‘रवी शंकर’ हा माहितीपट रसिकांना पाहता येईल. यानंतर एस. बी. नायमपल्ली यांनी दिग्दर्शित केलेला पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्यावरील लघुपट दाखविण्यात येणार आहे. ख्यातनाम कलाकारांबरोबर संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाºया ‘अंतरंग’ मध्ये यावर्षी प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. गायन क्षेत्रातील त्यांचा प्रवास ऐकण्याची संधी या वेळी रसिकांना मिळणार आहे. श्रीनिवास जोशी हे या वेळी त्यांच्याशी संवाद साधतील. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत.आज महोत्सवात (दुपारी ३ वा. प्रारंभ)मधुकर धुमाळ (सनई), डॉ. विजय राजपूत (गायन), देबाशिष भट्टाचार्य (चतुरंगी वादन), पं. राजन आणि साजन मिश्रा (गायन), पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी).
‘सवाई’चा स्वरयज्ञ आजपासून, २८ कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 6:24 AM