सुनील राऊत, पुणेरोज पोटाची खळ्गी भरण्याची चिंता असलेल्या मजूरांना बचतीची सवय लागावी, तसेच या मजूरांनी उघडयावर शौचास न जाता सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून वारजे येथील झोपडपटटीत ‘समग्र’ या स्वयंसेवी संस्थेने सुरू केलेली अनोखी ‘टॉयलेट बँक’ चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या काही महिन्यात तब्बल ३६५ कुंटूंबे या बँकेचे सभासद बनले असून त्यांच्या तब्बल ५० हजार रूपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. शहरात उघडयावर प्रात:विधीस जाणा-यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढलेली आहे. प्रामुख्याने झोपडपटटयामध्ये नागरिकांनी स्वच्छतागृहाचा वापर करावा, या उद्देशाने पालिकेने सम्रग या संस्थेच्या माध्यमातून वारजे येथील तुळजा भवानी वस्ती आणि रामनगर परिसरात स्वच्छता गृहाचा वापर करणाऱ्या नागरिकास दरमहा ५० रूपयांचे गिफ्ट कूपन देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. या कुपनच्या माध्यमातून संबधित व्यक्तीस परिसरातील किराणा मालाच्या दुकानात गृहपयोगी साहित्य खरेदी करता येत होते. एका घरातील पाच व्यक्तींनी शौचालय वापरल्यास त्यांना दरमहा अडीचशे ते तिनशें रूपयाचे किराणामालाचे साहित्य मिळत होते. त्यामुळे या योजनेस प्रतिसाद वाढू लागला. याच वेळी येणारे काही नागरिक आपल्या खिशातील पैसे संस्थेच्या प्रतिनिधीकडे ठेवत असत, ही बाब लक्षात आल्याने या नागरिकांना आपल्या खिशात शिल्लक राहिलेली रक्कम बÞचत म्हणून वापरता यावी यासाठी संस्थेकडून जमा करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यातून ही टॉयलेट बँकेची संकल्पना पुढे आली आहे.
‘टॉयलेट बँके’चा बचत अन् स्वच्छतेचा वसा
By admin | Published: December 05, 2014 5:05 AM