पुणे : आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे... मोबाईलमध्ये हवी ती माहिती गुगलवर मिळते... आता याच गुगलच्या मॅप सुविधेचा महापालिकेने अभिनव वापर करण्यास सुरुवात केली आहे. रस्ते, त्यावरील वाहतूक कोंडी, हवी ती ठिकाणे शोधण्याची सुविधा असलेल्या गुगल मॅपवर आता स्वच्छता गृहे सुद्धा शोधता येणार आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही हायटेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरामध्ये महापालिकेची जवळपास दीड हजार स्वच्छता गृहे आहेत. स्वच्छ भारत मिशन स्वच्छतागृह (एसबीएम टॉयलेट) या सांकेतिक नावाने गुगल मॅपवर ही स्वच्छता गृहे दिसणार आहेत. याचा फायदा शहरामध्ये नव्याने आलेल्या नागरिकांना अथवा अपरिचित भागात गेल्यावर नागरिकांना होणार आहे. पालिकेच्या दीड हजार स्वच्छतागृहांचा वापर नागरिकांकडून केला जातो. यातील बरीचशी स्वच्छतागृहे मुख्य रस्त्यावर आहेत, तर बरीचशी गल्लीबोळातही आहेत. मुख्य रस्त्यावरील स्वच्छतागृहे नागरिकांना सापडतात. मात्र, आतील भागात असलेली स्वच्छतागृहे शोधणे अडचणीचे असते. पालिकेने या पूर्वीच स्वच्छतागृहांची माहिती तसेच ठिकाण दर्शविणारे फलक लावले आहेत. परंतू, आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पालिकेने स्वच्छतागृहांचे लोकेशनच थेट आपल्या बोटांवर आणून ठेवले आहे. गुगल मॅपवर जाऊन पाहिल्यास जागोजाग एसबीएम टॉयलेट असे संकेतचिन्ह दिसू लागते. महिला, पुरुषांसाठी असलेली स्वतंत्र स्वच्छतागृहेही सांकेतिक चिन्हांद्वारे दर्शविली जात आहेत. त्यामुळे अन्य कोणतीही गोष्ट शोधताना स्वच्छतागृह शोधणेही सोपे झाले आहे. === गेल्या काही वर्षात रस्ते, वास्तू, हॉटेल्स, दुकाने आवश्यक गोष्टी शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर वाढला आहे. नागरिकांकडून अगदी सहज त्याचा वापर केला जात आहे. याच गुगल मॅपचा वापर करुन स्वच्छता गृह शोधण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. स्वच्छतागृहांकडे जाण्यासाठीचा रस्ता, त्याचे अंतर आणि दिशा याची माहितीही नकाशासह या मॅपवर दर्शविण्यात येते. - ज्ञानेश्वर मोळक, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन
आता गुगल मॅपवर शोधता येणार स्वच्छता गृहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 7:00 AM
एका क्लिकवर मिळणार दीड हजार स्वच्छतागृहांची माहिती...
ठळक मुद्देमहापालिकेकडून हाय टेक सुविधा : एका क्लिकवर मिळणार दीड हजार स्वच्छतागृहांची माहिती