पुणे : टोकिओ ऑलम्पिक स्पर्धेत सुभेदार नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक पटकावत देशाची मान जगभरात उंचावली असली तरी त्यात आपल्या पुण्याचाही मोठा वाटा आहे. कारण की सुभेदार नीरज याने पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथून भालाफेकीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्या जोरावर ऑलम्पिक स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदकाचा वेध घेतला. त्याच्या या कामगिरीमुळे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
शेतकरी कुटुंबातील असलेल्या सुभेदार मेजर नीरजचा जन्म हरियाना राज्यातील पानीपत शहरातील खांद्रा गावात झाला. नीरज २६ ऑगस्ट २०१६ रोजी ज्युनिअर कमिशन ऑफिसर पदावर भारतीय लष्करात रुजू झाला. सुभेदार असलेल्या नीरज चोप्रा यांनी यापूर्वीही अॅथेलेटीक्स खेळामध्ये उतुंग कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे २०१८ मध्ये त्याला खेळातील मानाचा समजला जाणाऱ्या अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सोबतच खेळ आणि लष्करातील चांगल्या कामगिरीमुळे नीरजला लष्करातील मानाचे असलेले विशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आले आहे.
पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये ऑलम्पिक खेळासाठी लागणाऱ्या मोठ्या सुविधा आहेत. यात लष्करातील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात या संस्थेतून खेळाडू प्रशिक्षण घेत असतात. येथील प्रशिक्षणाच्या जोरावरच अनेक खेळाडूंनी जागतिक स्पर्धेत भारतीय लष्करातील देशाची मान उंचावली आहे.