पुणे : सहकारी तरुणीची कागदपत्रे आणि बनावट सह्या करून दोघांनी परस्पर तिच्या नावावर ४५ लाख रुपये कर्ज काढून अपहार केल्याचा प्रकार बालेवाडी येथील एका आयटी कंपनीत घडला. कर्ज घेतल्यानंतर दोघांनी सुरुवातीला काही हप्तेही फेडले. मात्र, हप्ते थकल्यानंतर बँकांनी वसुलीसाठी तगादा लावल्यावर तरुणीला या प्रकरणाची माहिती झाली.
विमानतळ परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणीने याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून ध्रुवकुमार, विष्णू शर्मा आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ एप्रिल २०१९ ते ८ मे २०२४ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार बालेवाडी येथील एकाच कंपनीत गेल्या पाच वर्षांपासून कामाला आहेत. त्यामुळे त्यांची चांगली ओळख आहे. आरोपी ध्रुवकुमारने तक्रारदार तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, सॅलरी ब्रेकअप आदी कागदपत्रे घेतली होती. तसेच, आरोपीला एका बँकेतून पाच लाख रुपयांचे कर्ज काढायचे आहे. त्यासाठी त्याने तक्रारदार तरुणीचा संदर्भ दिला आहे. त्या बँकेचा ओटीपी ई-मेलवर येईल, असे सांगून आरोपी तरुणीकडून तिचा ई-मेलचा युजर आयडी आणि पासवर्ड घेतला होता.
त्यानंतर आरोपी ध्रुवकुमार आणि विष्णू यांनी दोन ते तीन खासगी बँका व वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांचे क्रेडिट मॅनेजर व इतरांच्या मदतीने आरोपीने तरुणीला कल्पना न देता तिच्या नावे बँकेत खाते उघडले. तसेच, तरुणीची बनवाट स्वाक्षरी करून तरुणीच्या नावे ४५ लाख रुपयांचे कर्ज काढले. त्यासाठी बनावट सह्या व खोटी कागदपत्रे, तरुणीच्या सॅलरी स्लिपमध्ये छेडछाड करून बँकांना सादर केली होती. या पैशांचा आरोपींनी अपहार केला. सुरुवातीला त्यांनी कर्जाचे काही हप्ते भरले. मात्र, त्यानंतर हप्ते थकवले. तेव्हा बँकांनी तरुणीशी संपर्क साधला असता, तरुणीला कर्ज प्रकरणाची माहिती मिळाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चौधरी या करत आहेत.