पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी काही आठवणी सांगितल्या. यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आत्मभान कसे जागृत ठेवावे, हेही सांगितले. मार्गदर्शन करताना, कानपिचक्याही घेतल्या. ‘आंदोलने करणे, शक्तिप्रदर्शन करणे, एकजूट करून काम करणे ती मजा काही औरच होती, जाने कहा गये वो दिन, अशी आठवण त्यांनी सांगितली.बैठकीच्या प्रारंभी ‘जिसने संकल्प किया उसने इतिहास रचाया है...’ हे गीत सुरेश खटावकर यांनी सादर केले. या गीताचा संदर्भ घेऊन गडकरी यांनी एक तासांच्या मनोगतात, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडची आठवण सांगत ते म्हणाले, ‘‘३३ वर्षांपूर्वी प्रदेश कार्यकारिणीची पिंपरी-चिंचवडमध्ये बैठक झाली होती. त्या वेळी असणाऱ्यांपैकी मोजकेच लोक व्यासपीठावर आहेत. त्या वेळी प्रमोदजींच्या समारोपाच्या भाषणाची वाट कार्यकर्ते पाहत असत. कारण त्यात भविष्याचा वेध असायचा. त्या वेळचे राम जेठमलानी यांचे भाषण आठवते. त्या वेळी सर्व निवडणुकांमध्ये पराजय पाहिल्यानंतर जेठमलानी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला होता. रोमच्या राजाची गोष्ट सांगितली होती. रोमचा हुकूमशहा कुरूप होता. मात्र, त्याला त्याचाही गर्व होता. त्याने एक दिवस फर्मान काढले होते. राजाने ‘मी एक दिवस विवस्त्रपणे फिरणार आहे, तुम्ही सर्वांनी गॅलरीत बसून पहावे.’ त्यावर एका पत्रकाराने रक्ताने पत्र लिहून राजाला पाठविले. ‘राजा मुळातच तू करूप आहेस.’ असे आशयाचे पत्र दिले. पत्र मिळताच राजाने सैन्यास त्याच्या घरी पाठविले. घरी सैन्य जाण्यापूर्वीच त्या पत्रकाराने आत्महत्या केली होती आणि चिठ्ठीत ‘खरे बोलण्याची ही किंमत.’’ असे लिहले होते. त्यामुळे राजकारणात विजयाचा उन्माद नसावा. विजयाचा अहंकार असू नये. विजय साजरा करताना नम्रता गमविली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पराभव झाल्यास निराश होऊ नये, यासाठी हे उदाहरण जेठमलानींनी दिले होते. विजयोत्सव साजरा करीत असताना ज्यांनी १९५२ पासून समर्पण, बलिदान दिले. त्यांचेही स्मरण व्हायला हवे. तसेच प्रत्येकाने राष्ट्रनिर्माणासाठी पाच संकल्प करायला हवेत. (प्रतिनिधी)
जाने कहा गए वो दिन...
By admin | Published: April 27, 2017 4:55 AM