पुणेःधायरी परिसरातील अंगणवाड्यांच्या दूरवस्थेबाबत आवाज उठवत त्यांच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. यावर गांभीर्याने विचार करून तातडीने दुरुस्तीची कामे सुरु करण्याऐवजी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे या प्रश्नाची टोलवाटोलवी करण्यात येत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून नाचवण्यात येत असलेल्या कागदी घोड्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
धायरी परिसरात धायरी गावठाणातील दोन, तर रायकर मळा, पोकळे वस्ती, बेनकर वस्ती, अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ प्रत्येकी एक अशा सहा अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांची प्रचंड दूरवस्था झाली असून काही ठिकाणी महावितरणने मीटरही काढून नेले आहेत. मोडकळीस आलेले छत, रंग उडालेल्या भिंती, प्रचंड अस्वच्छता, अशा अवस्थेत या अंगणवाड्या आहेत. यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी धायरीतील नागरिकांकडून करण्यात आली होती. परंतु दहा दिवस उलटूनही याबाबत अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेने धायरीसह समाविष्ट 34 गावांतील अंगणवाड्या शहरी नागरी विभागाच्या महिला व बालविकास प्रकल्प विभागाकडे हस्तांतरीत केल्या. त्यानंतर या विभागाने अंगणवाड्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व इतर गोष्टी करणे गरजेचे होते. मात्र, याबाबत या विभागाने अद्याप कोणतीही पाहणीच न केल्याचे पुढे आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, धायरी ग्रामपंचायत महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर सदर अंगणवाड्या संंबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले.
''सदर अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसंबंधी नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे प्रकरण पुढील कारवाईसाठी पुणे शहर (नागरी) विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. - जे. बी. मिरासे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग''