लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी पेंढार: दोन वर्षांपासून बंद असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी, ता. जुन्नर येथील टोल नाका बुधवारपासून (दि १) पुन्हा सुरू झाला. हा टोलनाका सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
चाळकवाडी येथील ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच या टोलनाक्याला विरोध होता. हा टोलनाका चाळकवाडी हद्दीतबाहेर हटवावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी हा टोलनाका बंद करण्यात आला होता. हा टोलनाका बंद करण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांमध्ये मोठे राजकीय नाट्य घडले होते. हा टोलनाका बंद करण्यात दोन्ही पक्षांनी श्रेयवाद घेण्यात आम्हीच टोल नाका बंद केला असे सांगत आपली पाठ थोपटून घेतली होती. संपूर्ण काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू होऊन देणार नाही, असे दोन्हीही पक्षांकडून सांगण्यात आले होते. असे असतानाच सद्गुरूनगर, आळेफाटा बाह्यवळण, कळंब, मंचर बाह्यवळणचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसतानाही हा टोलनाका सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने टोलवसूल करण्याचे काम घेतले आहे. हा टोलनाका अचानक चालू झाल्यामुळे फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांकडून दुप्पट टोलवसुली केला जात आहे. त्यामुळे टोलनाक्यावर प्रवाशांकडून आणि टोलनाका कर्मचारी यामध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहे.