शिवाजी पवारश्रीरामपूर : शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक काढत शाळा व्यवस्थापन समितीवर जबाबदारी टाकली आहे. प्रत्यक्षात मात्र समितीचे सदस्य या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने मुख्याध्यापक हतबल झाल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुरुवारी (दि.१८) हे परिपत्रक काढले. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्याकरिता मुख्याध्यापकांना तपशीलासह काही माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी पूर्व तयारीचा भाग म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व आरोग्य विभाग यांच्यावर काही जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. शाळा निर्जंतुकीकरण, पालकांशी संवाद, पाठ्यपुस्तक वाटप, स्थलांतरितांना प्रवेश, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आदी कामांचा त्यात समावेश आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय हा समिती आणि ग्रामपंचायतीने एकत्रित घ्यावयाचा असला तरी समिती सदस्य मात्र या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. ते मुख्याध्यापकांकडे चेंडू टोलावत आहेत.>दिवसाआड शाळा भरवण्याचा विचारशाळेच्या पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांची गर्दी कमी करण्याकरिता दिवसाआड वर्ग भरवण्याचा विचार शिक्षण विभागाने मांडला आहे. तीन तासांच्या अंतराने वर्ग सुरू करण्याचा तसेच सम-विषम दिवस पाळण्याचेही सुचविण्यात आले आहे. मात्र ही सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर निश्चित केली गेली आहे.शैैक्षणिक वर्षाच्या तयारीवर प्रश्नचिन्हजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे पाचशे शाळांचे वीजबिल ग्रामपंचायतींनी थकविले आहे. तर शाळा निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतींकडे कुठल्याही निधीची तरतूद नाही. त्यामुळे एकूणच तयारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
व्यवस्थापन समितीकडून टोलवाटोलवी, शाळा सुरू करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 1:48 AM