-------
रांजणगाव सांडस : रांजणगाव सांडस येथील शेतकरी अजित दिलीप रणदिवे यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये दीड लाख रुपये खर्च करून टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत टोमॅटो तोड सुरू असून दोन्ही दिवसांपासून टोमॅटोला बाजारभाव चांगला नव्हता. आज तर केवळ तीन रुपये इतका बाजारभाव असल्याने टोमॅटो बाजार नेण्याचा खर्चही निघत नसल्याने रणदिवे यांनी टोमॅटो अक्षरश: फेकून दिली आणि त्यांच्या शेतातच जणू टोमॅटोचा लाल चिखल जमा झाल्याचे चित्र दिसले.
सध्या टोमॅटोचा भाव पडला असल्याने कमी-अधिक प्रमाणात सर्वच शेतकऱ्यांची अवस्था अशीच झालेली शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. शिरूरच्या पूर्वभागातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला तालुक्याच्या पूर्व भागात पावसाळ्याला जोरदार सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्याबरोबर तरकारी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात अधूनमधून रिमझिम पाऊस पडत असला तरी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
महावितरण कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा वीजबिल भरले नसल्यामुळे वीज कनेक्शन बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीला व विहिरीला बऱ्यापैकी पाणी असून देखील ते पाणी शेतातील पिकांना देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत जळू लागली आहेत. टोमॅटो फ्लॉवर कोबी आदी तरकारी पिकांना म्हणावा असा बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाऊस पडला नसल्यामुळे चाराटंचाई जाणवू लागली आहे. कांद्याला बाजारभाव चांगला होता पण तो देखील आता उतरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे अनेक शेतकऱ्यांचा कांदा वखारीत सडू लागला आहे.
तरकारी पिकांना बाजारभाव नाही ,महावितरणने विद्युत पुरवठा बंद केला अशा अनेक समस्यांना शेतकरी सध्या सामोरे जात आहेत.
--
अनेक टोमॅटो शेतातच सडत आहेत
--
टोमॅटो पिकाचे एक क्रेट साठ रुपये दराने विकले जात आहे महिला मजूरवर्गाची तोडणी व वाहतूक यांचा ताळमेळ मेळ घालण्यासाठी खर्च जास्त होत आहे अवघड झाले आहे. त्यामुळे टोमॅटो तोडणी बंद केलेले आहे. अक्षरश: लहान मुलाप्रमाणे टोमॅटोच्या पिकाला जपले होते, परंतु बाजारभावाअभावी टोमॅटो शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे.
--
फोटो क्रमांक : ०३ रांजणगाव सांडस टोमॅटो लाल चिखल
फोटो ओळी: तीन रुपये किलो बाजारभाव आल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातच फेकून दिलेला टोमॅटो.