नारायणपूर : पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागातील हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी, कोडीत, गराडे, सोमर्डी, सुपे आदी गावांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो पीक घेतले जाते; पण बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांवर ते फेकून देण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी जनावरांना टाकण्यात येत आहे. आज एका किलोला ३ रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे तोडण्याचा खर्चही निघत नाही. गेल्या रविवारपासून बाजारभाव पडले आहेत. पुणे बाजारपेठेत तर सर्व खर्च जाऊन एक रुपया भाव मिळत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरच काही परप्रांतीय मालाची प्रतवारी करून चांगलाच माल घेतात. त्यांची एक जाळी किमान ३० किलो भरते. आज त्यांनी एका जाळीला ८० रुपये बाजार दिला. म्हणजे, शेतकऱ्यांना २ रुपये ४० पैसे बाजारभाव पडला. राहिलेला बारीक माल काही शेतकरी हे ज्यूस कंपनीला देतात. नाईलाज असल्याने शेतकऱ्यांना माल हा परप्रांतीयांना द्यावा लागत आहे. एका एकराला लागवडीला खर्च सरासरी हा १० ते १५ हजार होत असतो. तोही खर्च निघतो का नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. (वार्ताहर)
टोमॅटो मातीमोल
By admin | Published: November 20, 2014 4:31 AM